Join us

'ती क्लिप फेक असून आम्ही...'; Bigg Boss Ott 3 बंदीची मागणी केल्यावर 'जिओ'चं अधिकृत स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 1:31 PM

शिवसेनेच्या सचिव आणि प्रवक्ता डॉ.मनिषा कायंदे यांनी बिग बॉस ओटीटी ३ बंदीची मागणी केली होती. त्यावर जिओ सिनेमाने अधिकृत स्पष्टीकरण जारी केलंय (Bigg Boss Ott 3)

शिवसेनेच्या सचिव आणि प्रवक्ता डॉ.मनिषा कायंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना लेखी निवेदन लिहून Bigg Boss Ott 3 वर बंदी आणण्याची मागणी केली. Bigg Boss Ott 3 मध्ये अश्लीलता दाखवली जात असून तातडीने हा शो बंद करण्यात यावा अशी मागणी मनीषा कायंदे यांनी केली. यानंतर आज Jio Cinema च्या प्रवक्त्यांनी अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे.

जिओ सिनेमाचं स्पष्टीकरण

जिओ सिनेमाने स्पष्टीकरण देत म्हटलंय, "JioCinema या आमच्या प्लॅटफॉर्मवर प्रवाहित होणाऱ्या कोणत्याही कलाकृतीची गुणवत्ता आणि योग्यता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतो. JioCinema वर स्ट्रीम केलेल्या बिग बॉस OTT मध्ये नियमांचं उल्लंघन होईल असा कोणताही कंटेंट नव्हता. अश्लीलतेचा समावेश असलेली जी व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली ती बनावट आहे."

जिओ सिनेमा स्पष्टीकरणात पुढे म्हणते की,  "JioCinema वर आमच्या दर्शकांचा असलेला विश्वास सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. ही बनावट क्लिप तयार करणे आणि व्हायरल करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. ही क्लिप कशी व्हायरल झाली याचा शोध आमची टीम घेत आहे. बिग बॉस OTT आणि JioCinema विरुद्ध असा बदनामीकारक कंटेंट पसरवल्याबद्दल जबाबदार असलेल्यांविरुद्ध कारवाई होईल." असं JioCinema च्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी तक्रारीत काय म्हटले होते?

बिग बॉस सिजन ३ मधील १८ जुलै २०२४ रोजी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये कलाकार कॅमेऱ्यासमोर अतिशय बीभत्स  आणि किळसवाणे कृत्य करत असल्याचे दाखवल्याचे पोलिस आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले. याच शो दरम्यान अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांनी कलाकारांना कौटुंबिक नात्याच्या सर्व सीमा पार करत सामाजिक मूल्ये पायदळी तुडवली असल्याची टीका डॉ. कायंदे यांनी केली. 

टॅग्स :बिग बॉसशिवसेना