आपल्या सगळ्यांच्या कुतूहलाचा आणि उत्सुकतेचा विषय म्हणजे आपल्या लाडक्या आणि नावाजलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेणे. त्यांच्या आयुष्यात हळूच डोकावून बघायला आपल्या सगळ्यांनाच खूप आवडते. ही मंडळी त्यांच्या खर्या आयुष्यात कशा आहेत, त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, त्यांची सुख - दु:ख, भावुक करणार्या गोष्टी, ते काय विचार करतात, त्यांचा इथवरचा प्रवास कसा होता, या मंडळी प्रसिद्धीच्या शिखरावर कसे बरे पोहचले असतील ? आणि बरच काही... असे अनेक किंबहूना याहून अधिक प्रश्न आपल्या मनामध्ये येऊन जातात... त्यांचे मोठेपण आपल्या सगळ्यांपासून काही लपलेले नाही पण ते माणूस म्हणून कसे आहेत ? काही न ऐकलेले किस्से, प्रेक्षकांना आता कळणार आहेत कलर्स मराठीवरील “दोन स्पेशल” या नव्या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आपल्या सगळ्यांचा लाडका, अष्टपैलू अभिनेता जितेंद्र जोशी करणार आहे. मालिका, रंगभूमी, चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारांसोबत जितुने मारलेल्या मनमुराद गप्पांचा रंगतदार अनुभव घेण्यासाठी नक्की बघा सदाबहार, गप्पावेल्हाळ कार्यक्रम “दोन स्पेशल” ३१ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ज्या प्रमाणे आपण आरश्याला मनातील सुख - दुःख, व्यथा, गुपितं, सगळं मन मोकळेपणानी सांगतो, तसाच आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अशी एक खास व्यक्ति असते जी आपल्या आयुष्यात घडणार्या प्रत्येक घटनांची साक्षीदार असते, जिला आपण आपली सुख - दु:ख, आनंद, सांगतो, जिला सगळ गुपितं माहिती असतात... अश्याच त्या व्यक्तिसोबत रंगणार आहे “दोन स्पेशल” हा कार्यक्रम... कार्यक्रमामध्ये आलेल्या कलाकारांसोबत जितेंद्र जोशी त्याच्या अनोख्या अंदाजात गप्पा मारणार आहे. दोन स्पेशलच्या पहिल्या भागात सुबोध भावे आणि सुमित राघवनसोबत गप्पांची कडक मैफल रंगणार आहे... याचसोबत गुरु ठाकरू – किशोर कदम, बिग बॉस मराठी सीझन 2 पर्वातील काही मंडळी कार्यक्रमाच्या येत्या भागांमध्ये हजेरी लावणार आहेत. तेव्हा या लोकप्रिय मंडळींची दुसरी बाजू, त्यांची गुपित प्रेक्षकांना या कार्यक्रमाद्वारे बघण्याची संधी मिळणार आहे.
कार्यक्रमाविषयी बोलताना जितेंद्र जोशी म्हणाला, “कार्यक्रमामध्ये येणारे सेलिब्रिटी लोकांना माहिती असलेली माणसं असणार आहेत. त्या माहिती असलेल्या माणसांच्या आयुष्यातील माहिती नसलेल्या गोष्टींना स्पर्श करण्याचा आणि त्यांचे विचार जाणून घेण्याचा कार्यक्रमाचा प्रयत्न असेल... माझा कार्यक्रम आहे त्यामुळे अर्थातच त्यात बनावटीपणा नसेल मी आलेल्या सेलिब्रिटींशी दिलखुलास गप्पा मारणार आहे”.