केवळ महाराष्ट्रच नाही तर अवघ्या भारतात ज्याची ग्रामदेवता म्हणून पूजा केली जाते अशा कालभैरवाची आजवर पुढे न आलेली रंजक गोष्ट 'जोगेश्वरीचा पती भैरवनाथ' (Jogeshwaricha Pati Bhairavnath) या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली. अतिशय उत्कंठावर्धक कथानक आणि त्याला साजेसा असा कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. प्रत्येक भागागणीक प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणाऱ्या या मालिकेत आता जोगेश्वरीदेवी आणि भैरवनाथाचा विवाह सोहळा पार पडणार आहे. येत्या २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान हे विवाह विशेष भाग रात्री ८.३० वाजता शेमारु मराठीबाणा वाहिनीवरून बघायला मिळणार आहेत.
‘जोगेश्वरीचा पती भैरवनाथ’ ही मालिका आता अतिशय रंजक वळणावर आली आहे. एकीकडे पार्वतीमातेने भैरवनाथाच्या लग्नासाठी धरलेला हट्ट तर दुसरीकडे जोगेश्वरीचे लग्न आपला प्रधान शुंभकशी लावण्याचा चंग बांधलेला राजा तक्षक आणि यामध्ये अडकलेली जोगेश्वरी अशी रंजक कथा प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. राजा तक्षकाच्या महालातून भैरवनाथाने आपल्या इच्छेविरुद्ध आपले हरण केल्याने जोगेश्वरीच्या मनात त्याच्याबद्दल रागाची भावना निर्माण झालेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पार्वती देवीने या दोघांच्या विवाहसोहळ्याची तयारी हाती घेतलेली आहे. काशीचा कोतवाल आणि महादेवाचा निस्सीम भक्त असलेल्या भैरवनाथाची लग्नगाठ प्रत्यक्ष महादेव आणि पार्वती देवी बांधणार असल्यामुळे या विवाह सोहळ्याला विशेष महत्त्व असणार आहे.
पौराणिक कथांमध्ये अतिशय रंजक पद्धतीने वर्णिलेला हा लग्नसोहळा प्रेक्षकांसाठी त्याच रंजक आणि भव्य-दिव्य पद्धतीने सादर होणार आहे. प्रत्यक्ष देव आणि देवीचा हा अलौकिक विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यामध्ये पारंपरिक स्वरूपाचे विविध विधी बघायला मिळणार आहेत. ज्यामध्ये हळद, मधुपर्क, सीमांतपूजन, कन्यादान, सूत्र वेष्टन, सप्तपदी या विधींचा समावेश असणार आहे. तक्षक राजाचा या लग्नाला विरोध असल्यामुळे जोगेश्वरीचे कन्यादान साक्षात भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता करणार आहे तर देवांचे देव महादेव आणि पार्वती माता या दांपत्याला आशीर्वाद देणार आहेत. एकंदरीत देवी देवतांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने हा अलौकिक असा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यादरम्यान तक्षक राजा आणि शंभुक काही विघ्न आणण्याचा प्रयत्न करणार का हे बघणंही रंजक ठरणार आहे.