अभिनेत्री जुही परमार गेल्या २५ वर्षांपासून टीव्हीच्या दुनियेत कार्यरत आहे. चाहत्यांना तिला कुमकुमच्या भूमिकेत पाहायला आवडते. या मालिकेतून जुहीला प्रत्येक घराघरात विशेष ओळख मिळाली. 'कुमकुम' या टीव्ही मालिकेतून चाहत्यांचे उदंड प्रेम मिळालेली अभिनेत्री जुही परमार एकेकाळी इंडस्ट्रीची लोकप्रिय स्टार होती. लोकांना जुहीचा सुंदरपणा आणि साधेपणा खूप आवडला. जुही आज तिचा ४३वा वाढदिवस साजरा करते आहे. आज तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया काही खास गोष्टी.
जुही परमारने तिच्या करिअरची सुरुवात 1998 मध्ये 'वोह' या टीव्ही शोमधून केली होती. त्यानंतर दोन वर्षांनी ती 'चुरियन' आणि 'ये जीवन है'मध्ये दिसली. जुहीने पुन्हा ब्रेक घेतला आणि 'कुमकुम'मधून टीव्हीवर कमबॅक केले. २००२ मध्ये आलेल्या या शोने जुहीला टीव्हीची क्वीन बनवले.
खूप कमीजणांना माहिती आहे की, जुही थायरॉईडसारखा आजाराने ग्रस्त होती. थायरॉईडमुळे तिचं वजन खूप झपाट्याने वाढलं होतं. २ ते ३ महिन्यांच्या आता १५ ते १७ किलो अभिनेत्रीचं वजन वाढलं होतं. याचा खुलासा तिने स्वत: आपल्या व्लॉगच्या माध्यमातून केला होता. वजन वाढल्यामुळे तिचा चेहऱ्याला सूज आली होती. चेहऱ्याला सूज आल्यामुळे तिला ओळखणंही कठीण झाले होते. मूड स्विंगसमुळे स्वभावही चि़डचिडा झाला होता. थायरॉईडबाबत कळायला जुहीला बराच उशीर झाला होता. सतत वजन वाढत असल्यामुळे आईने तिला थायरॉईडची टेस्ट करायला सांगितली. टेस्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर तिने या आजाराशी लढायचं ठरवलं.
जुहीने अभिनेता सचिन श्रॉफसोबत २००९ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या काहीवर्षानंतर २०१८मध्ये हे कपल विभक्त झालं. सध्या जुही तिची मुलगी समायराचा सिंगल मदर म्हणून संभाळ करत आहे. ती आपल्या मुलीसोबतचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. 'फॅमिली २' या वेब सिरीजच्या माध्यमातून तिनं अभिनयामध्ये कमबॅक केलं आहे.