कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे़ साहजिकच अख्खा देश ठप्प पडला आहे. फिल्म इंडस्ट्रीही ठप्प आहे. ना नव्या चित्रपटाचे शूटींग, ना रोजच्या मालिकांचे शूटींग. अशात सर्व चॅनल जुने लोकप्रिय शो पुन्हा एकदा रिपीट टेलिकास्ट करत आहेत. दूरदर्शनवर अनेक क्लासिक शो सुरु झालेत. रामायण, महाभारत, शक्तिमान आणि आता बच्चे कंपनीचा आवडता शो ‘जंगल बुक’. या कार्टुन मालिकेने लहानग्यासोबत मोठ्यांवरही जादू केली होती. काल बुधवारपासून दूरदर्शनवर ‘जंगल बुक’ सुरू झाले. पण हे काय, हा शो पाहून मोगलीचे चाहते जाम भडकले.
होय, ‘जंगल बुक’चा पहिला एपिसोड प्रसारित झाला. पण ‘जंगल जंगल बात चली है...’ हे टायटल ट्रॅक कुठेही वाजले नाही. त्याऐवजी दुसरेच गाणे ऐकायला मिळाल. इतकेच नाही तर अनेक ठिकाणी दुसरीच डबिंग ऐकायला मिळाली. मोगली व बगीराचा आवाज डबिंगद्वारे बदलण्यात आला.तीन दशकांपूर्वी रविवारी ‘जंगल जंगल बात चली है...’ या गाण्याने मुलांची झोप उघडायची. प्रत्येक घरातून या गाण्याचे स्वर ऐकू यायचे. काल टीव्हीवर मोगली पुन्हा आला. पण हे गाणे ऐकू आले नाही. साहजिकच अनेकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर नेटक-यांनी अनेक सवाल केलेत.
अखेर हे टायटल सॉन्ग शोमधून का गायब झाले, का गाळण्यात आले, असे सवाल अनेकांनी केले. तूर्तास याचे उत्तर कुणाकडेही नाही.
‘जंगल जंगल बात चली है...’ या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले होते. तर विशाल भारद्वाज यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले होते. त्यावेळी विशाल भारद्वाज हे नाव फार मोठे नाव नव्हते. पण यानंतर त्यांनी मकडी, ब्ल्यू अंब्रेला यासारखे सिनेमे बनवले़ पाठोपाठ ओंकारा, मकबूल या सिनेमांमुळे दिग्दर्शक म्हणून नावारूपास आले.