Join us

पहिल्यांदाच मराठी टेलिव्हिजनवर दिसणार काजोल, 'या' खास व्यक्तीची मिळणार तिला साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 18:03 IST

kajol: उत्तम अभिनयासोबतच आपल्या मस्तीखोर अंदाजामुळे चर्चेत येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे काजोल.

 उत्तम अभिनयासोबतच आपल्या मस्तीखोर अंदाजामुळे चर्चेत येणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे काजोल (kajol). कलाविश्वाप्रमाणेच काजोल सोशल मीडियावरही सक्रीय असते.  काजोल आपले स्टेटमेंट्स आणि हटके स्टाईल्समुळे नेहमीच चर्चेत असते. काजोल पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजनवर दिसणार आहे. 

कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचे नवे पर्व नुकतेच सुरू झाले असून या कार्यक्रमाच्या पहिल्याच आठवड्यात विशेष अतिथी म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीला पडलेले सुंदर स्वप्न,   ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा आणि लाडकी अभिनेत्री काजोल ही मायलेकींची गोड जोडी उपस्थित राहणार आहे. 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर पहिल्यांदाच या दोघींमधला अनोखा बंध पाहायला मिळणार आहे. या दोघी जणी 'एबल डिसेबल ऑल पीपल टुगेदर' (ADAPT)  या संस्थेसाठी 'कोण होणार करोडपती' हा खेळ खेळणार आहेत.

 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाच्या शनिवारच्या पहिल्याच विशेष भागात ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेत्री काजोल ह्या दोघी सहभागी होणार आहेत. या भागात मायलेकींचे हळुवार बंध, काजोलच्या नावाची गंमत, काजोलच्या लहानपणीचे किस्से अशा अनेक किश्शांचा उलगडा या भागात सचिन खेडेकर यांच्याशी संवाद साधताना होणार आहे. तनुजा आणि काजोल यांच्याबरोबर काजोलचा मित्र लेखक, दिग्दर्शक निरंजन अय्यंगार आणि तनुजा यांची मैत्रीण ज्येष्ठ अभिनेत्री भारती आचरेकर हेही या भागात उपस्थित असणार आहेत.

काजोलला 'बाजिगर'च्या सेटवर शाहरूख खान का ओरडला होता, काजोलचा पहिला सिनेमा बघताना तनुजाने तिचा हात घट्ट का धरून ठेवला होता, तनुजा यांच्या 'लग्नाची बेडी' या नाटकाचे अनुभव;  अशा अनेक उत्कंठावर्धक गोष्टींनी हा विशेष भाग  रंगलेला असल्याने प्रेक्षकांसाठी  विशेष पाहुण्यांचा सहभाग असलेला हा पहिला विशेष भाग निश्चितच पर्वणी ठरणार आहे.  

टॅग्स :काजोलसोनी मराठी