भारताच्या घटनेचे शिल्पकार आणि लोकशाहीचे त्राते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र हे इतिहासातलं एक महान पर्व आहे. इतिहासाचं हे सोनेरी पान पुन्हा उलगडण्यात येत आहे ‘स्टार प्रवाह’वर सुरु असलेल्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यता निवारणासाठी जे लढे दिले त्यात काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाचं अभूतपूर्व स्थान आहे. फक्त सनातनी हिंदूंनाच जागं करण्यासाठी नाही तर त्यावेळच्या सत्ताधारी इंग्रजांनाही जाग यावी आणि दलितांना, शोषितांना त्यांचे मूलभूत हक्क मिळावेत यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता. हा लढा 2 मार्च 1930 ला सुरू झाला आणि पुढे पाच वर्ष चालला.
काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाची ही क्रांतिकारक घटना स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे या लढ्यात कवी कुसुमाग्रज यांनी देखिल सहभाग घेतला होता. त्यांच्या क्रांतिकारी कवितांची सुरुवात याच लढ्यापासून होत गेली असं म्हण्टलं जातं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत दाखवल्या जाणाऱ्या काळाराम मंदिर सत्याग्रहामध्ये कवी कुसुमाग्रजांच्या सहभागाचाही संदर्भ दाखवण्यात येईल.