'डान्स + 4' या कार्यक्रमाचे चाहते असलेले भारताचे माजी कर्णधार आणि नामवंत क्रिकेटपटू कपिल देव लवकरच या कार्यक्रमात अतिथी परीक्षक म्हणून सहभागी होणार आहेत. भारतातील महान क्रिकेटपटू कपिल देव, ज्यांना हरियाणा हरिकेनच्या नावानेही ओळखले जाते, ते डान्स+ ४ या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यास खूपच उत्सुक होते. या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाचा त्यांचा अनुभव खूपच छान होता असे त्यांनी सांगितले. 'डान्स + 4' या शोमधील डान्सिंग टॅलेन्ट पाहून ते थक्क झाले आणि म्हणाले की, क्रिकेटप्रमाणेच डान्सच्या मंचावरसुद्धा रीटेक्स नसतात. त्यामुळे माझ्यासाठी हा कार्यक्रम पाहाणे खूपच खास आहे.
कपिल देव हे 'डान्स + 4' कार्यक्रमाचे मोठे चाहते आहेत. फील क्य्रू ही स्पर्धक टीम त्याची अतिशय आवडती असून या टीमचे बलात्कारविरोधी नृत्य विशेष लोकप्रिय झाले होते. कार्यक्रमाचा सुपरजज्ज रेमो डिसुझा याच्याशी कपिल देव यांचे जवळचे संबंध असून या कार्यक्रमात येणाऱ्या सर्व गुणी कलाकारांची त्यांनी वेळोवेळी प्रशंसा केली आहे. आपल्याला जो कार्यक्रम प्रचंड आवडतो, त्याचा भाग व्हायला मिळाल्याने कपिल देव खूप खूश झाले होते.
'डान्स + 4' कार्यक्रमातील बी-युनिक या ग्रुपने त्यांचा परफॉर्मन्स सादर झाल्यानंतर कपिलजींना विनंती केली की, त्यांनी १९८३ साली अख्ख्या देशाला नाचण्यासाठी कारण दिले होते आणि आता त्यांनी मंचावर येऊन नाचावे. आपल्या शांत स्वभावासाठी मानले जाणारे कपिलजी आधी लाजत होते, पण अस्सल पंजाबी असल्यामुळे त्यांनाही फार काळ राहावले नाही आणि त्यांनी मंचावर स्पर्धकांसोबत धमाल डान्स केला. ते म्हणाले, “आज मला किती मजा आली ते मी शब्दांत मांडू शकत नाही. या शोवर पुन्हा येण्यासाठी मी उत्सुक आहे.” हाय एनर्जी ‘इश्क तेरा तडपावे’ या गाण्यावर ते नाचले आणि नंतर सुपर जज रेमो डिसुझाही त्यात सामिल झाले. डान्स+ ४ चा हा भाग प्रेक्षकांना या शनिवार-रविवारी रात्री ८ वाजता स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे.