Join us

कपिल शर्माने ट्विटरवरून त्याच्या चाहत्यांना दिली ही गोड बातमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 11:30 IST

कपिल शर्मा जोरदार पुनरागमनाच्या तयारीत आहे. कपिलनेच ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

मागचे अख्खे वर्ष कपिल शर्माची कसोटी पाहणारे ठरले. सहकलाकार सुनील ग्रोव्हरसोबत त्याचे वाजले आणि इथून जणू कपिलचे वाईट दिवस सुरू झाले. यानंतर कपिलबद्दल चांगल्या बातम्या कमी अन् वाईट बातम्याच जास्त आल्यात. सुनील ग्रोव्हरसोबत वाद झाल्या झाल्या कपिल मद्याच्या आहारी गेल्याची बातमी आली. मग तो डिप्रेशनमध्ये गेल्याचे कानावर आले. यानंतर कपिलने सेटवर येणेच बंद केल्याची बातमी आली. पाठोपाठ मीडियाशी त्याने पंगा घेतला. एक्स गर्लफ्रेन्डने त्याच्यावर नाही नाही ते आरोप केलेत. एवढे कमी की काय, वर्षभरातच्या आतच त्याचा नवा कोरा शो बंद झाला. ‘फिरंगी’ हा चित्रपटही आपटला. यानंतर कपिल अचानक गायब झाला. पण आता कपिल जोरदार पुनरागमनाच्या तयारीत आहे. कपिलनेच ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या चाहत्यांना दिली आहे.

कपिल शर्माने ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवरून ही बातमी त्याच्या चाहत्यांना दिली आहे. त्याने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, जल्द ही वापस आ रहा हूँ... तुमच्यासाठी द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम पुन्हा एकदा घेऊन येत आहे. ही बातमी कपिलने सोशल मीडियावरून दिल्यावर त्याचे चाहते देखील प्रचंड खूश झाले आहेत. 

‘द कपिल शर्मा शो’ हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून रंगली होती. सोनी टीव्हीनेही या वृत्ताला काही आठवड्यांपूर्वीच दुजोरा दिला होता. या कार्यक्रमाची तयारीही सुरू झाली असून या महिन्यातच कपिल त्याच्या शोसह परतणार असल्याचे म्हटले जात आहे.  

‘द कपिल शर्मा शो’ मधून कपिल शर्मा परतणार असला तरी हा शो एका नव्या रूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे चॅट शो हे स्वरूप कायम ठेवून अन्य काही बदल या शोमध्ये करण्यात येतील. अगदी आगळ्यावेगळ्या रूपात हा शो प्रेक्षकांसमोर येईल अशी चर्चा रंगली आहे. 

याचदरम्यान कपिल निर्माता म्हणूनही दिसणार आहे. ‘सन आॅफ मनजीत सिंग’ या पंजाबी चित्रपटाची तो निर्मिती करतोय. आॅक्टोबर महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :कपिल शर्मा