सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक सेलिब्रिटींचे शुभमंगल पार पडलं आहे. सिनेसृष्टीतील विविध कलाकार मंडळी रेशीमगाठीत अडकले आहेत. येत्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. यात कॉमेडी किंग कपिल शर्माही लग्नबंधनात अडकणार आहे. खुद्द कपिलनेच काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर आपली लग्न पत्रिका शेअर करत फॅन्सना ही गुड न्युज दिली होती.
गेल्या काही दिवसांपासून कपिलच्या लग्नाच्या चर्चा रंगत होत्या. मात्र यावर कपिलकडून कोणत्याच प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. आता खुद्द कपिलनेच त्याची लग्न पत्रिका शेअर करत साऱ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिला. १२ डिसेंबरला कपिल गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार आहे. सध्या कपिलच्या लग्नाची जोरदार तयारीही सुरू झाली आहे. लग्नानंतर १४ डिसेंबरला अमृतसर येथील पंचतारांकित हॉटेलात कपिलचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रांसाठी २४ तारखेला मुंबईत दुसरे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.
कपिल आणि गिन्नीचे लव्ह मॅरेज आहे. त्यांच्या लग्नात काय काय अडचणी आल्या हे नुकतेच कपिलने एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे. कपिल आणि गिन्नी यांची ओळख २००५ मध्ये एका महाविद्यालयात ऑडिशनच्या दरम्यान झाली होती. त्यावेळी गिन्नी केवळ १९ वर्षांची तर कपिल २४ वर्षांचा होता. काहीच दिवसांत त्या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. कपिल कमवायला लागल्यानंतर आईला घेऊन गिन्नीच्या घरी लग्नाची मागणी घालायला गेला होता. त्यावेळी गिन्नीच्या वडिलांनी शटअप म्हणत त्यांच्या लग्नासाठी नकार दिला होता. त्यानंतर कपिल त्याच्या कामात व्यग्र झाला तर गिन्नी तिच्या एमबीएच्या शिक्षणात... दरम्यानच्या काळात कपिल मुंबईत राहायला लागला. त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. कपिल कामात बिझी असल्याने गिन्नीने त्याला कधी डिस्टर्ब केले नाही. २४ डिसेंबर २०१६ ला कपिलने गिन्नीला फोन करून लग्नासाठी विचारले आणि तिने देखील क्षणात होकार दिला.