टीव्हीवरील लोकप्रिय कॉमेडी 'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma Show) शोमधील तीर्थानंद राव (Teerthanand Rao) या कॉमेडियनने फेसबुकवर लाईव्ह येत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तीर्थानंदला शोमध्ये ज्युनिअर नाना पाटेकर म्हणून ओळख मिळाली आहे. फिनाईल पिऊन त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिस वेळीच तिथे पोहोचल्याने आर्टिस्टला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तीर्थानंद राव याने हे पाऊल उचलण्यामागे एक महिला असल्याचा खुलासा झाला आहे. त्या महिलेला दोन मुली आहेत आणि तीर्थानंद महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये होता अशी माहिती मिळाली आहे. तीर्थानंदने माहिती देत सांगितले,'काही दिवसांपूर्वीच आमची ओळख झाली होती. आम्ही लिव्ह इनमध्ये राहत होतो. पण सोबत राहत असताना समजलं की ती प्रोस्टिट्यूट आहे. मी तिच्यापासून दूर गेलो. पण तिने माझ्यावर केस केली, मला धमक्या दिल्या. यामुळेच मी गेल्या अनेक दिवसांपासून घरीही गेलो नाही. तिच्यामुळे माझ्यावर ३ ते ४ लाख रुपयांचं कर्ज झालं. मला फूटपाथवर राहावे लागले आणि मी तणावात गेलो. याच कारणाने मी हे पाऊल उचलले.'
तीर्थानंदच्या या व्हिडिओबद्दल कळताच शांतिनगर ठाण्याचे पोलिस त्वरित त्याच्या घरी पोहोचले. तो बेशुद्ध अवस्थेत होता. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तीर्थानंदने याआधीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. 27 डिसेंबर 2021 रोजी त्याने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आर्थिक कारणांमुळे त्याने हे पाऊल उचलले होते. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले.