प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा (kapil sharma) त्याच्या विनोद कौशल्याच्या जोरावर अविरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये कायम त्याच्या नावाची चर्चा असते. आज कपिलने यश, प्रसिद्धी, स्टारडम सारं काही मिळवलं आहे. मात्र, एक काळ असा होता जेव्हा त्याच्या आयुष्यात सगळं उद्धवस्त झालं होतं. इतकंच नाही तर त्याच्या मनात आत्महत्येचाही विचार आला होता.
प्रत्येकाच्या जीवनाच्या दोन बाजू असतात. कपिलच्या बाबतीतही तेच आहे. प्रेक्षकांना कायम आनंदी वाटणारा, त्यांना हसवणाऱ्या कपिलने खऱ्या आयुष्यात बऱ्याच ठेचा खाल्ल्या आहेत. या संघर्षाच्या भट्टीत तापल्यानंतर तो आज या यशाच्या शिखरावर पोहोचला आहे. कपिलने एका सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान त्याच्या आयुष्यातील खडतड प्रवासावर भाष्य केलं होतं.
दारुच्या आहारी गेला होता कपिल
"माझ्या आयुष्यात असा एक काळ आला होता जेव्हा मी सतत आत्महत्या करण्याचा विचार करत होतो. ही गोष्ट २०१७ सालची आहे. त्यावेळी मी नैराश्यात गेलो होतो. तेव्हा मी सतत स्वत:ला एका खोलीत कोंडून घ्यायचो आणि आत्महत्येचा विचार करायचो. माझा शो बंद झाल्यानंतरच माझ्या मनात आत्महत्येचा विचार यायला सुरुवात झाली होती. इतकंच नाही तर मी दारुच्याही खूप आहारी गेलो होतो", असं कपिल म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "माझ्या आयुष्यातील तो डार्क फेज होता. तेव्हा मला कायम असं वाटायचं की माझ्या आजुबाजूला जे कोणी आहेत ते फक्त त्यांच्या स्वार्थासाठी माझ्यासोबत आहेत. पण, हळूहळू मी त्या सगळ्यातून बाहेर पडलो आणि गोष्टी बदलू लागल्या."
दरम्यान, कपिल शर्माने द कपिल शर्मा शो नंतर अनेक सिनेमांमध्येही काम केलं. परंतु, त्याचे सिनेमा फारसे यशस्वी ठरले नाही. सध्या नेटफ्लिक्सवर त्याचा द ग्रेट इंडियन कपिल शो हा कार्यक्रम स्ट्रीम होत आहे. यात अलिकडेच अनिल कपूर आणि फराह खान यांनी हजेरी लावली होती.