छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माची (Kapil Sharma) बातचं न्यारी. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारा कपिल शर्मा कुठल्या स्टारपेक्षा कमी नाही. आज त्याच्याकडे पैसा, प्रसिद्धी, ऐश्वर्य सगळं काही आहे. अर्थात हे मिळवण्यासाठी त्यानं अथक परिश्रम घेतले आहेत.
वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा कपिल अवघ्या 23 वर्षांचा होता. कपिलचे वडील पोलिसात हेड कॉन्स्टेबल होते. वडिलांच्या मृत्यूनंतर कपिलला त्यांची नोकरी मिळत होती. परंतु, ही नोकरी नाकारून कपिलनं उराशी बाळगलेलं अभिनयाचं स्वप्नं पूर्ण करण्याचं ठरवलं. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ने कपिलला एक ओळख दिली. हा शो त्यानं जिंकला आणि तो ‘कॉमेडी सर्कस’मध्ये आला. यानंतर त्याने ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ हा स्वत:चा शो सुरू केला आणि त्यांनतर त्याने ‘द कपिल शर्मा’ शो (The Kapil Sharma Show) या नावाने छोट्या पडदयावर पुनरागमन केलं. पण या शोची कल्पना कपिलला कशी सुचली, हे तुम्हाला ठाऊक आहे का? तर एका डान्स रिअॅलिटी शोच्या निमित्तानं.
होय, कपिल शर्माला ‘झलक दिखला जा 6’ या लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शोच्या होस्टची ऑफर मिळाली होती. या शो संदर्भात चर्चा करण्यासाठी कपिल शर्मा कलर्स टीव्हीच्या ऑफिसमध्ये गेला होता. मनीष पॉलसोबत हा शो होस्ट करायचा, असं यावेळी त्याला सांगण्यात आलं. विशेष म्हणजे कपिलने हे मान्य केलं. त्यानंतर त्याला बीबीसीच्या प्रोडक्शन हाउसमध्ये पाठवलं गेलं.
पण इथे गेल्यावर मात्र कपिलला एक वेगळाच अनुभव आला. ‘तू खूप लठ्ठ आहेस. तू आधी तुझं वजन थोडं कमी कर’, असं त्याला सांगितलं गेलं. ही संधी हातातून जाणार की काय असं वाटत असताना, खुद्द चॅनलने प्रोडक्शन हाऊसची मनधरणी केली. मुुलगा फारच टॅलेंटेड आहे. हा शो त्याला होस्ट करू द्या. तो नंतर वजन कमी करेल, असं चॅनलने प्रोडक्शन हाऊसला सांगितलं. यानंतर कुठे कपिलला हा शो होस्ट करण्याची संधी मिळाली आणि कपिलने या संधीचं सोनं केलं. याच शोच्या मीटिंगदरम्यान त्याने प्रोडक्शन टीमला आपल्या कॉमेडी शोच्या कल्पनेबद्दल सांगितलं. त्यांना ही कल्पना भलतीच आवडली. त्यांनी कपिलला दोन दिवसांचा वेळ देत या शोचा फॉरमॅट तयार करायला सांगितलं. त्यानुसार कपिलने एक सुंदर प्रेझेंटेशन केलं. हे प्रेझेंटेशन त्यांना इतकं आवडलं की, त्याचा शो फायनल झाला आणि कपिलच्याच नावाने हा शो सुरु झाला. हा शो होता ‘कॉमेडी नाईट्स विद कपिल’. यानंतरचा सगळा इतिहास तुम्हाला ठाऊक आहेच.