शाका लाका बूम बूम, कसौटी जिंदगी की, क्या होगा निम्मो का, संगम, देख इंडिया दे, लाफ्टर के पटाखे, कॉमेडी सर्कस, जरा नचके दिखा, दिल मिल गए, जोर का झटका, कॉमेडी का महा मुकाबला, नचलेवे विथ सरोज खान, सरस्वतीचंद्र, बेहद, बेपनाह अशा अनेक मालिका गाजवणारी आणि आपल्या अदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी टीव्ही अभिनेत्री जेनिफर विंगेट हिचा आज (30 मे) वाढदिवस.
जेनिफरचा जन्म मुंबईतील एका मराठी-ख्रिश्चन परिवारात झाला. जेनिफरचे वडील ख्रिश्चन तर आई पंजाबी आहे. वयाच्या १२ व्या वर्षी तिने इंडस्ट्रीत पदार्पण केले. पण खरे तर तिला अभिनेत्री नाही तर एअर होस्टेस बनायचे होते. आमिर खानच्या अकेले हम अकेले तुम या चित्रपटात ती झळकली. राजा की आएगी बारात, राजा को रानी से प्यार हो गया, कुछ ना कहो, या सिनेमांमध्येही तिने काम केले. बेहद या मालिकेत तिने साकारलेली मायाची भूमिका प्रचंड गाजली होती.
जेनिफर तिच्या अदाकारीइतकीच तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावरचे तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांना अक्षरश: वेड लावतात. जेनिफरचे व्यवसायिक आयुष्यापेक्षा तिचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. करण सिंह ग्रोव्हरसोबत तिचे लग्न झाले होते. पण काहीच वर्षांत त्या दोघांनी घटस्फोट घेतला. करणचे जेनिफरसोबत दुसरे लग्न होते. त्याचे पहिले लग्न अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत झाले होते.
करण आणि जेनिफर हे छोट्या पडद्यावरचे एक क्यूट कपल मानले जात होते. त्यांनी घटस्फोट घेतल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. करणने जेनिफर विंगेटला घटस्फोट देऊन बिपाशाशी लग्न का केलं हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. याबद्दल करणने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत आपली भूमिका मांडली होती. जेनिफरशी लग्न करणं ही आपली घोडचूक होती असं करणने एका मुलाखतीत म्हटलं होतं. काही जण मैत्रीच्या नात्यापर्यंत ठीक असतात. त्यांचा जीवनसाथी म्हणून विचार होऊ नये असं सांगत जेनिफरशी केलेल्या लग्नाबाबत त्यानं पश्चाताप व्यक्त केला होता. घाईघाईत निर्णय घेऊन आपण चूक केली होती, मात्र भविष्यात त्याची पुनरावृत्ती करणार नाही असंही तो या मुलाखतीत म्हणाला होता.