हरिद्वार येथे आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यात नुकतेच शाही स्नान पार पडले. या शाही स्नानासाठी अनेक आखाड्यांतील साधू-संत आले होते. यावेळी कोरोना नियमांच्या पार चिंधड्या उडाल्याचे पाहायला मिळाले. अनेक साधूही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मोठी गर्दी असल्याने अनेक ठिकाणी कोरोना नियमांचेही उल्लंघन होताना दिसून आले. येथे ना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत आहे, ना कुणी मास्क लावताना दिसत आहे. कुंभेळ्यातील ही गर्दी पाहून अनेक सेलिब्रेटींनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावरील एका पोस्टनंतर आता अभिनेता करण वाहीला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. या नागा साधुंसाठी वर्क फ्रॉम होम नाही का? यांनी गंगेचं पाणी आपल्या घरात नेऊन अंघोळ करावी अशी पोस्ट करणने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. पण या पोस्टनंतर लगेचच कुंभमेळ्यातील शाही स्नानानंतर तेथील साधुंना कोरोनाची लागण झाली असल्याच्या बातम्या मीडियात दाखवण्यात आल्या आणि यासाठी आता काही नेटकरी करणला जबाबदार धरताना दिसत आहेत. प्रत्येक वेळी तुम्ही हिंदूंनाच दोष का देता? तुझ्या श्रापित वाणीमुळे ही घटना घडली, असे विचित्र आरोप नेटिझन्स करणवर करत असून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत.
करणने काही स्क्रीनशॉर्ट शेअर करत सोशल मीडियाद्वारे ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे.