'करिष्मा का करिष्मा' फेम ही चिमुकली आठवतेय का? 90s च्या मुलांची ही आवडती मालिका होती. मालिकेत मुख्य भूमिकेत झळकलेल्या या मुलीचं खरं नाव झनक शुक्ला (Jhanak Shukla) आहे. शाहरुख खानच्या 'कल हो ना हो' सिनेमातही तिने भूमिका साकारली होती. ती छोटी झनक आता नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड स्वप्नील सूर्यवंशीसह तिने लग्नगाठ बांधली आहे.
झनक शुक्लाने बालवयात मालिका, सिनेमांमध्ये काम केलं. त्याकाळी तिच्या क्युटनेसवर सर्वच फिदा होते. 'करिष्मा का करिष्मा' मालिकेत तिने रोबोटची भूमिका साकारली होती. कमी वयातही तिने आपल्या अभिनयाने सर्वांचं मन जिंकलं होतं. आता झनक २८ व्या वर्षी लग्नबंधनात अडकली आहे. गेल्या काही वर्षांपासून ती स्वप्नील सूर्यवंशीला डेट करत होती. गेल्या वर्षी त्यांचा साखरपुडाही झाला. तर आता या जोडीने आयुष्यभराची गाठ बांधली आहे. झनकने लग्नात लाल रंगाची साडी नेसली आहे. यामध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तर स्वप्नील सूर्यवंशीने पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि लाल फेटा बांधला आहे. नागपूरमध्ये दोघांचा लग्नसोहळा पार पडला. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
झनक शुक्लाची आई सुप्रिया शुक्ला या देखील अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक हिंदी मालिकेत काम केलं आहे. झनकला लहानपणापासून अभिनयाचीच आवड होती. मात्र नंतर तिने शिक्षणाला प्राधान्य दिलं. त्यातच तिला इतिहास विषयात रस होता. त्यामुळे तिने त्यातच करिअर केलं. अशा प्रकारे ती इंडस्ट्रीतून गायब झाली. झनकचा नवरा स्वप्नील मेकॅनिकल इंजिनिअर आहे.