‘कसौटी जिंदगी की’ (Kasautii Zindagii Kay) ही छोट्या पडद्यावरची गाजलेली मालिका. या मालिकेचा पहिला सीझन तुफान लोकप्रिय झाला होता. सोबत मालिकेचे कलाकारही लोकप्रिय झाले होते. या सीझनमध्ये श्वेता तिवारी (Shweta Tiwari) लीड भूमिकेत होती. तर तिच्या अपोझिट अभिनेता सीजेन खान (Cezanne Khan) दिसला होता. श्वेताने साकारलेली प्रेरणा आणि सीजेनने साकारलेला अनुराग बासू यांची पडद्यावरची केमिस्ट्री प्रेक्षकांना भलतीच भावली होती. पडद्यामागेही या केमिस्ट्रीची चर्चा होती. एकीकडे सेटवर दोघांचे अजिबात पटत नाही, अशा बातम्या होत्या तर दुसरीकडे दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचीही चर्चा होती. अर्थात दोघांनीही यावर मौन बाळगणे पसंत केले होते. पण आता इतक्या वर्षानंतर सीजेन खान श्वेता तिवारीसोबतच्या बॉन्डिंगबद्दल बोलला आहे. श्वेता तिवारी ही माझ्या आयुष्यातील पहिली व शेवटची चूक होती, असे त्याने म्हटले आहे.‘इंडिया फोरम’ला दिलेल्या मुलाखतीत सीजेन यावर बोलला.
मला आता तिच्याशी काहीही देणेघेणे नाही...श्वेता तिवारी ही माझी पहिली आणि शेवटची चूक होती. यापेक्षा अधिक मी काहीही बोलू इच्छित नाही. आता मला तिच्याशी काहीही देणेघेणे नाही. ती काय करतेय मला माहित नाही. मालिकेच्या निमित्ताने आमच्यात खूप चांगली मैत्री झाली होती. आम्ही खूप खासगी गोष्टी देखील शेअर केल्या होत्या. मी माझ्या आयुष्यात तिच्या जितका जवळ होतो कदाचित तितक्या जवळ कुणाच्याच नसेल. पण त्या गोष्टी आता व्यर्थ आहेत, असे सीजेन म्हणाला.
‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेमुळे प्रेरणा आणि अनुरागची जोडी हिट झाली होती. आजही अनेक प्रेक्षक दोघांना याच नावाने ओळखतात. सीजेन व श्वेता रिलेशनशिपमध्ये होते आणि याचमुळे श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरीचा घटस्फोट झाला होता, असेही मानले जाते. ‘कसौटी जिंदगी की’नंतर श्वेता अजूनही टीव्ही इंडस्ट्रीत अॅक्टिव्ह आहे तर सीजेन या शोनंतर छोट्या पडद्यापासून लांब आहे.