मुंबई - लोकप्रिय रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'चा 10वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी केबीसीच्या 10व्या सीझनच्या शूटिंगला सुरुवात देखील केली आहे. बिग बी सोशल मीडियावर चांगलेच अॅक्टिव्ह असतात. केबीसीच्या नवीन सीझनबाबतची माहितीदेखील त्यांनी ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. विशेष म्हणजे 'कौन बनेगा करोडपती'च्या या सीझनमध्ये समाजसेवक डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी प्रकाश आमटे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या दोघांबाबत ट्विटरवर लिहिताना अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे की, 'डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे या दोन असामान्य व्यक्तिमत्त्वांचा सहवास लाभणं सन्मानाची बाब आहे. या दोघांचे आयुष्य आणि त्यांनी आदिवासी समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे'.
दरम्यान, प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांचा 'कौन बनेगा करोडपती' शोमधील एपिसोड 7 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. डॉ. विकास आमटे यांनीही ट्विटरच्या माध्यमातून 7 सप्टेंबरला हा शो पाहण्याचं आवाहन केले. या सीझनचा पहिला एपिसोड 3 सप्टेंबरला रात्री 9 वाजता प्रदर्शित होणार आहे. अमिताभ बच्चन यांनी 'कौन बनेगा करोडपती'च्या एकूण 8 सीझनचं होस्टिंग केले आहे.