कौन बनेगा करोडपतीमुळे अनेक लोकांचे नशीब पालटले आहे. असाच एक विजेता आहे सुशील कुमार ज्याने कौन बनेगा करोडपती ५ शोमध्ये ५ कोटी जिंकले होते. सुशीलकुमार याने १ कोटी नाही तर ५ कोटी जिंकले होते. बिहारच्या सुशील कुमारचे अमिताभ बच्चन देखील फॅन झाले होते. सुशील कुमारने जिंकलेल्या ५ कोटी रुपयांमुळे त्याचे जीवन बदलून गेले. मात्र सुशील कुमार काही दिवसानंतर कंगाल झाला.
सुशील कुमारने फेसबूक पोस्ट शेअर करत म्हटले की, २०१५ आणि २०१६ ही वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होती. मी लोकल सेलिब्रिटी झालो होतो, बिहारमध्ये वेगवेगळ्या जागेवर महिन्यात १० ते १५ शो मी अटेंड करत होतो. याच दरम्यान मी आपल्या अभ्यासापासून दूर देखील जात होतो.
पुढे त्याने म्हटले की, कारण मी एक लोकल चेहरा होतो, त्यावेळी मी मीडियाला खूपच गांभीर्याने घेत होतो. खरंतर अनेक पत्रकार माझ्याबद्दल लिहित होते, माझी मुलाखत देखील घेत होते. मला त्यांच्याशी बोलण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तरी देखील मी त्यांना आपले बिझनेस आणि इतर गोष्टींबद्दल सांगायचो. कारण लोकांना वाटू नये की मी बेरोजगार आहे. खरेतर काही दिवसांनीच माझा बिझनेस तोट्यात येत होता.
सुशीलच्या म्हणण्यानुसार केबीसीनंतर तो लोकांचे भले करणारा माणूस झाला, ज्याला गुपचूप दान देणे पसंत होते. मी एका महिन्यात अनेक इव्हेंटला उपस्थित राहून पैसे दान करत होतो. ज्यामुळे अनेक वेळा लोकांनी मला फसवलं देखील, ज्याबद्दल मला उशीरा समजले. अभ्यासापासून दूर जात असल्यामुळे सुशीलला इतरांशी बोलणे आता नकोसे झाले होते. इतकेच नाही तर त्याला दारु आणि सिग्रेटचे व्यसन लागले होते.
त्याने पुढे सांगितले की, ही स्टोरी तुम्हाला जरा फिल्मी वाटू शकते. एका रात्री तो सिनेमा पाहत होता, यावर त्याच्या पत्नीला राग आला, त्यांचे थोडे भांडण झाले, तो नाराज झाला आणि घराबाहेर आला. यानंतर एका इंग्रजी दैनिकाच्या पत्रकाराचा त्याला कॉल केला. सुशीलने सांगितले की, त्या पत्रकाराशी माझे चांगले बोलणे सुरु होते, तेव्हाच सुशील यांना असा प्रश्न विचारण्यात आला तो त्यांना आवडला नाही. या प्रश्नावर सुशीलने उत्तर देताना सांगितलं, कौन बनेगा करोडपती या शो मधून जिंकलेले ५ कोटी रुपये आता संपलेले आहेत, मी दोन गाई पाळल्या आहेत आणि त्यांचं दूध विकून घर चालवतोय. ही बातमी पसरली आणि सुशीलने सर्वांपासून अंतर ठेवणे सुरु केले होते.
सुशीलचा आवडता विषय हा सिनेमा आहे, म्हणून तो मुंबईला आला आणि त्याने आपले नशीब आजमावले. सुशीलने दिलेल्या माहितीनुसार त्याने चित्रपट निर्मितीविषयी जाणून घेतले. आपल्या मित्रासोबत तो मुंबईत राहिला आणि त्याने तीन स्क्रीप्ट लिहिल्या. ही स्क्रीप्ट लिहिल्यानंतर त्याला एका निर्मात्याने २० हजार रुपये दिले. बिहारला परतल्यानंतर सुशीलने शिक्षक होण्याची तयारी केली आणि तो ट्यूशनही घेतो आहे. आता त्याने आता दारु आणि सिग्रेट कायमची सोडली आहे. सुशील आता पर्यावरण संवर्धनाचेही काम करतो आहे.