कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळे सिझन चांगलेच हिट झाले आहेत. या कार्यक्रमाच्या या सिझनला देखील प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अमिताभ बच्चन यांचा हा कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड आवडता आहे. आता पहिल्याच आठवड्यात या कार्यक्रमाने टिआरपी रेसमध्ये सातवा क्रमांक मिळवला आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता आजदेखील तितकीच असल्याचे यातून दिसून येत आहे.
टिआरपी चार्टनुसार यंदाच्या आठवड्यात ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका पहिल्या स्थानावर आहे. मोहनिश खान आणि शिवांगी जोशी यांची केमिस्ट्री लोकांना प्रचंड आवडत असून हा कार्यक्रम गेल्या आठवड्यात देखील टिआरपी रेसमध्ये अव्वलच होता तर कुंडली भाग्य हा कार्यक्रम दुसऱ्या स्थानावर आहे. कुंडली भाग्य नंतर ये रिश्ते है प्यार के ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. या कार्यक्रमाने या आठवड्यात चांगलीच मजल मारली आहे असेच म्हणावे लागेल. कारण ही मालिका गेल्या आठवड्यात सहाव्या स्थानावर होती.
कुमकुम भाग्य ही मालिका गेल्या आठवड्यात तिसऱ्या क्रमांकावर होती. पण या आठवड्यात ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे तर तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका पाचव्या स्थानावर आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका गेल्या आठवड्यात सातव्या स्थानावर होती. या मालिकेचा टिआरपी अनेक वर्षांपासून खूपच चांगला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मध्ये दयाबेन ही व्यक्तिरेखा गेल्या कित्येक महिन्यांपासून प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळत नाहीये. तरी याचा परिणाम मालिकेच्या टिआरपीवर होत नसल्याचे दिसून येत आहे.
द कपिल शर्मा शोला या आठवड्यात चांगलाच धक्का बसला आहे. कारण हा कार्यक्रम या आठवड्यात पहिल्या पाचमध्ये नाहीये. हा कार्यक्रम गेल्या आठवड्यात चौथ्या क्रमांकावर होता आणि या आठवड्यात हा कार्यक्रम सहाव्या क्रमांकावर आहे तर कौन बनेगा करोडपती सातव्या क्रमांकावर आहे. सुपरस्टार सिंगर हा कार्यक्रम आठव्या क्रमांकावर, तुझसे है राबता नवव्या क्रमांकावर आणि छोटी सरदारनी दहाव्या क्रमांकावर आहे.