देवीयों और सज्जनों हे शब्द लवकरच पुन्हा एकदा कानावर पडणार आहेत, पुन्हा एकदा रंगणार प्रश्नांचा रंगमंच, पुन्हा उलगडणार अनेकांचं भावनिक विश्व, पुन्हा रंगणार गप्पांची मैफल आणि पुन्हा कुणी तरी सामान्यातील सामान्य बनणार करोडपती. कारण लवकरच कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसीचं नवं पर्व रसिकांच्या भेटीला येणार आहे.'कौन बनेगा करोडपती 10'चा प्रोमो रिलीज झाला आहे. प्रोमोमध्ये एका गरीब वडिलांच्या संघर्षाची इमोशनल कथा दाखवण्यात आली आहे. "तो देवियों और सज्जनों आप क्या करोगे, हालात को कोसोगे या हालात से पूछोगे कि कब तक रोकोगे।" 'कब तर रोकोगे' हे यावेळचे 'केबीसी'ची टॅगलाइन आहे. शोचा नवीन सीजन ऑगस्टपासून टेलीकास्ट होणार आहे.
वर्षानुवर्षे बिग बी अमिताभ बच्चन यांच्यामुळे केबीसी शो नव्या उंचीवर पोहचला आहे. बिग बींचा अनोखा अंदाज, शोमध्ये येणारे स्पर्धक, त्यांच्या बिग बींचा संवाद, शोमधून समोर येणा-या विविध भावनिक गोष्टी यामुळे केबीसीने टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलं. केबीसीपुढे इतर रिअॅलिटी शोची जादू फिकी पडली. यांत सलमानच्या बिग बॉस आणि इतर कॉमेडी तसंच सिंगिंग रिअॅलिटी शोचा उल्लेख करावा लागेल. 'केबीसी-९' ला मिळालेली प्रचंड लोकप्रियता पाहून केबीसीच्या निर्मात्यांनी या शोचं दहावं पर्व लवकरच रसिकांच्या भेटीला आणायचं ठरवलं आहे. याचे सूत्रसंचालन पुन्हा महानायकच करणार हे काही वेगळं सांगायलाच नको. त्यामुळे जस्ट वेट एंड वॉच...
आपल्या जीवनातील स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत असतो. मात्र प्रत्येकालाच त्याची स्वप्नं पूर्ण करता येतात असं नाही. मोजक्या मंडळींची स्वप्न साकार होतात. मात्र अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. महानायक आणि हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचं नाव केबीसीशी नाव जोडलं गेलं. त्यामुळे या केबीसीला एक परिमाण लाभलं होतं. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत.