'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर जाऊन बसण्याची आणि जास्तीत जास्त पैसे जिंकण्याची अनेकांची इच्छा असते. पण मोजक्याच लोकांची ही इच्छा पूर्ण होते. कोरोना काळातही या शोचं शूटींग सुरू झालं. इतकेच नाही तर मुंबईतील स्पर्धक स्वप्निल चव्हाण या शोमध्ये तब्बल २५ लाख रूपयांची रक्कमही जिंकले. यात महत्वाची बाब म्हणजे स्वप्निल चव्हाण हे या रकमेचं काय करणार याचा त्यांनी महाराष्ट्र टाइम्ससोबत बोलताना खुलासा केलाय. ते या पैशांचं काय करणार हे वाचून अशा ंसकंटाच्या काळातही माणूसकी शिल्लक आहे याचंच उदाहरण दिसेल.
मूळचे नागपूर जिल्ह्यातील असलेले स्वप्निल चव्हाण हे मुंबईत बांधकाम व्यवसायात काम करतात. अनेकांप्रमाणे त्यांचंही या कार्यक्रमात जाऊन हॉट सीटवर बसावं, अमिताभ बच्चन यांना भेटावं आणि जास्तीत जास्त रक्कम जिंकावी असं स्वप्न होतं. त्यांचं ते स्वप्न अखेर खरं ठरलं. सुरूवातीला आपल्या हे जमणार नाही असं त्यांना वाटत होतं. पण ते शोमध्ये गेलेही आणि २५ लाख रूपये जिंकले सुद्धा. (KBC: प्रश्न विचारताच हॅंग झाला अमिताभ बच्चन यांचा कॉम्प्युटर, अशी सांभाळली त्यांनी सिच्युएशन...)
त्यांनी महाराष्ट्र टाइम्ससोबत बोलताना सांगितलं की, 'मार्च महिन्यात ते बांधकाम व्यवसायात काहीतरी नवीन करणार होते. पण कोरोनामुळे त्यांचं मोठं नुकसान झालं. त्या मजूर गावाला गेले. त्यांना पगारही देता आला नाही. आता या रकमेतून मी त्यांना पगार देऊन त्यांना सन्मानानं परत बोलवणार आहे. तसेच कोरोना काळात झालेलं नुकसानही भरून काढणार आहे. इतकेच नाही तर कोरोनाच्या या संकटात मला समाजाला जी काही मदत करता येईल ती सुद्धा करणार आहे'.
या अनुभवाबद्दल ते म्हणाले की, 'मी आतापर्यंतच्या आयुष्यात अनेक लोकांना भेटलो. त्यापैकी हा एक स्वप्नासारखा अनुभव होता. महानायक अमिताभ बच्चन इतकं वय असूनही त्यांच्यातली ऊर्जा ओसंडून वाहत असते. त्यांचा उत्साह, काम करण्याची इच्छा, पद्धत हे सगळंच अवर्णनीय आहे. त्यांना एकदा तरी यांना जवळून बघता यावं असं बालपणापासूनचं स्वप्न होतं. ते या कार्यक्रमामुळे पूर्ण झालं'.