Join us  

"बिग बॉस मराठीचे चार सीझन गाजले नाहीत", केदार शिंदेंच्या वक्तव्यावर नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले- "रितेशच्या जागी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2024 10:39 AM

Bigg Boss Marathi 5 : केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. "बिग बॉस मराठीचे चार सीझन जे झाले ते लोकांना आवडले असतील. पण, ते गाजले नव्हते", असं केदार शिंदे म्हणाले आहेत.

Bigg Boss Marathi 5 : बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनमध्ये चाहत्यांना अनेक सरप्राइजेस मिळाले. बिग बॉस मराठीचा होस्ट बदलण्यापासून ते सदस्यांपर्यंत चाहत्यांना आश्चर्याचे धक्के मिळाले. यंदाचा बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे आणि गाजतही आहे. या पर्वाने टीआरपीचेही अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. बिग बॉस मराठीच्या आधीच्या पर्वांनाही प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. त्यामुळेच या पाचव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण, केदार शिंदेंचं म्हणणं मात्र थोडंसं वेगळं आहे. 

कलर्स मराठी वाहिनीचे हेड असलेल्या केदार शिंदेंनी नुकतीच अमोल परचुरे यांच्या कॅच अप या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये केदार शिंदेंनी बिग बॉस मराठीबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. "बिग बॉस मराठीचे चार सीझन जे झाले ते लोकांना आवडले असतील. पण, ते गाजले नव्हते", असं केदार शिंदे म्हणाले आहेत. पण, त्यांच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मुलाखतीच्या प्रोमो व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. 

"केदार शिंदे तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती. हा season प्रचंड unfair आहे. रितेश देशमुखच्या जागी महेश मांजरेकरांना आणा.. डायलॉगबाजी तरी जरा कमी होईल...", अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर दुसऱ्याने "याउलट आताचा जास्त गाजत नाहीये", असं म्हटलं आहे. "पहिले चार सीझन आम्ही आज पण बघतो, कारण त्यातले स्पर्धक निक्कीसारखे नव्हते","सहमत नाही...पहिला आणि तिसरा सीझन सुपरहिट होता", अशा कमेंट्स करत चाहत्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, केदार शिंदेंनी रितेश देशमुख आणि महेश मांजरेकर यांच्यामध्ये बिग बॉसच्या होस्टिंगवरुन होणाऱ्या तुलनेबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले, "महेश दादा आणि रितेश देशमुख यांची तुलना होणारच होती. पण, एक लक्षात ठेवा की सुनील गावस्कर चांगलाच खेळायचा पण सचिन तेंडुलकरही वाईट खेळत नव्हता". 

टॅग्स :बिग बॉस मराठीकेदार शिंदेरितेश देशमुख