मराठमोळी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. मागील वर्षी केतकी चितळेचा एक एपिसोड चांगलाच गाजला होता. एका वादग्रस्त फेसबुक पोस्टमुळे केतकीला तुरुंगाची हवा खावी लागली होती. आता पुन्हा एकदा चर्चा आहे ती केतकीच्या नव्या व्हिडीओची. होय, या व्हिडीओत हॅप्पी गुढीपाडवा म्हणणाऱ्यांची केतकीनं चांगलीच शाळा घेतली आहे.तर व्हिडीओ आहे पुण्यातला. आज गुढीपाडव्याच्या दिवशी केतकी पुण्यात आहे. पुण्यात सगळीकडे गुढीपाडव्याचा उत्साह पाहून केतकी सुखावली. पण याचवेळी काही गोष्टी तिला नेमक्या खटकल्या. मग काय, केतकीने लगेच व्हिडीओ शेअर करत, आपलं म्हणणं मांडलं.
केतकी म्हणाली... "मी केतकी चितेळे. मी पुण्यात आहे. म्हणजेच स्व: घोषित मावळ्यांच्या जन्मभूमीत. म्हणता येणार? म्हणूच शकतो आपण याला. रस्त्यावरून चालताना मला बऱ्याच ठिकाणी "हॅप्पी गुढीपाडवा" असे बरेच पोस्टर्स दिसले. या स्वघोषित मावळ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की, आता तुम्ही विसरता का महाराजांना, त्यांच्या शिकवणीला? केवळ दादागिरी करताना महाजांचं नाव वापरून तुम्ही एकप्रकारे त्यांचा अपमान करायला तयार आहात. पण नवीन वर्षाला "हॅप्पी गुढीपाडवा" म्हणायला तुम्हाला काही वाटत नाही. असो, तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षांच्या हार्दीक शुभेच्छा. जय हिंद. वंदे मातरम्. भारत माता की जय!", असं केतकी या व्हिडीओत म्हणतेय.
तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी तिच्या म्हणण्याला पाठींबा दिला आहे. कडू आहे पण सत्य आहे, चितळे बाई तुम्ही खूप रोखठोक बोलता, अशी कमेंट एकाने केली आहे. एकदम बरोबर, सहमत असंही अनेकांनी म्हटलं आहे.