Join us

मयुरी देशमुखनंतर 'खुलता कळी खुलेना' फेम ओमप्रकाश शिंदेंची एन्ट्री, दिसणार 'या' मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 2:43 PM

'खुलता कळी खुलेना' मालिकेत मुख्य भूमिका साकारून अभिनेता ओमप्रकाश शिंदे घराघरात पोहोचला. आता पुन्हा एकदा तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

'खुलता कळी खुलेना' ही छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकांपैकी एक. झी मराठी वाहिनीवरील या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. या मालिकेतील मानसी आणि विक्रांत ही जोडी प्रेक्षकांना आवडली होती. 'खुलता कळी खुलेना' मालिकेत मुख्य भूमिका साकारून अभिनेता ओमप्रकाश शिंदे घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने डॉ. विक्रांत ही भूमिका साकारली होती. या मालिकेने ओमप्रकाशला लोकप्रियता मिळवून दिली. आता पुन्हा एकदा तो प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. 

ओमप्रकाश शिंदे याची नव्या मालिकेत वर्णी लागली आहे. स्टार प्रवाहवर सुरू होणाऱ्या मालिकेतून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'थोडं तुझं थोडं माझं' या मालिकेत ओमप्रकाश दिसणार आहे. या मालिकेत तो रणजित हे पात्र साकारणार आहे. ओमप्रकाशला पु्न्हा टीव्हीवर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याची ही नवीन मालिका लवकरच सुरू होणार आहे. 

दरम्यान, ओमप्रकाश आधी 'खुलता कळी खुलेना' फेम अभिनेत्री मयुरी देशमुखनेदेखील स्टार प्रवाहच्या मालिकेत नुकतीच एन्ट्री घेतली आहे. 'मन धागा धागा जोडते नवा' या मालिकेत मयुरी दिसणार आहे. या मालिकेत ती सुखदा हे पात्र साकारणार आहे. ओमप्रकाश आणि मयुरीने 'खुलता कळी खुलेना' मालिकेत एकत्र काम केलं होतं. त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. 

'खुलता कळी खुलेना' मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आल्यानंतर ओमप्रकाशच्या हाती अनेक चांगले प्रोजेक्ट लागले. अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसला. 'लक्ष्मी सदैव मंगलम', 'का रे दुरावा', 'मुलगी झाली हो', 'तुझ्या इश्काचा नादखुळा' या मालिकांमध्ये त्याने काम केलं आहे. ओमप्रकाश शिंदेच्या 'थोडं तुझं थोडं माझं' या मालिकेत अभिनेत्री शिवानी सुर्वे, समीर परांजपे, मानसी कुलकर्णी हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. १७ जूनपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारमराठी अभिनेतास्टार प्रवाह