Join us  

'खुलता कळी खुलेना' फेम मयुरी देशमुखची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 4:02 PM

'खुलता कळी खुलेना' मालिकेनंतर मयुरी प्रसिद्धीझोतात आली. यानंतर ती अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही दिसली. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मयुरी सज्ज झाली आहे.

'खुलता कळी खुलेना' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून अभिनेत्री मयुरी देशमुख घराघरात पोहोचली. या मालिकेत मयुरीने डॉ. मानसी ही भूमिका साकारली होती. मयुरीला या मालिकेने खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. 'खुलता कळी खुलेना' मालिकेनंतर मयुरी प्रसिद्धीझोतात आली. यानंतर ती अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही दिसली. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी मयुरी सज्ज झाली आहे. 

टीव्हीवरील एका गाजलेल्या मालिकेत मयुरी देशमुख एन्ट्री घेणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेत आता एका नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. हे पात्र मयुरी देशमुख साकारताना दिसणार आहे. मयुरी 'मन धागा धागा जोडते नवा' मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत ती 'सुखदा' हे पात्र साकारणार आहे. 

स्टार प्रवाहच्या ऑफिशियल सोशल मीडिया अकाऊंटवरुन मयुरीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये मयुरी मन धागा धागा जोडते नवा मालिकेत एन्ट्री घेत असल्याचं सांगत आहे. मयुरीला पुन्हा मराठी मालिकेत पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. चाहत्यांनी या व्हिडिओवर तशा कमेंटही केल्या आहेत. 

मयुरी देशमुखने हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. 'इमली' या स्टार प्लसवरील मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारताना दिसली होती. या मालिकेत तिने खलनायिकेची भूमिका साकारली होती. मयुरीची ही भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'लग्न कल्लोळ' सिनेमात मयुरी दिसली होती.  

टॅग्स :मयुरी देशमुखटिव्ही कलाकारस्टार प्रवाह