“एक नगर होतं, तिथे एक होता राजा आणि एक होती राणी”... अत्यंत निरागस, अवखळ, आपल्या विश्वात रमणारी अशी मुलगी... एका देखण्या, रुबाबदार अशा राजाच्या ती बघताच क्षणी प्रेमात पडली... आणि तिथून सुरू झाली राजा – राणीची गोष्ट... अशा अनेक गोष्टी आपण सगळे लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण, आपल्या कथेतील राजा – राणीची गोष्ट आणि त्यांचा प्रवास या सगळ्यांहून जरा वेगळाच आहे असे म्हणावे लागेल.
रेशीमबंधांच्या गाठी स्वर्गातच बांधलेल्या असतात म्हणे... अगदी खरं आहे ! नशिबाचे खेळ निराळे, अनभिज्ञ असतात... जे जगात शोधत असतो ते आपल्याच दारात असतं... थंड वाऱ्याची झुळूक यावी, पौर्णिमेच्या प्रकाशात चांदण हसावं इतक्या सहज ती व्यक्ती समोर येते आणि मनात तरंग उठतात. अचानक ही भावना देणारी व्यक्ती कधी खोडकर, अवखळ,प्रेमळ अशी असते. कधी संघर्षातून, द्वेषातून प्रेमाचे अंकुर फुटतात, तर कधी विरुद्ध स्वभावातून... परमेश्वराने जोडललेल्या जन्मभराच्या या रेशीमगाठी बहुतांश विजोडच असतात.
परस्परविरोधी स्वभावाच्या व्यक्ति कधीच एकत्र येऊ शकत नाही तर त्या संसार कसा बरं करू शकतील ? हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. सत्यात अशाच दोन व्यक्ति एकमेकांच्या प्रेमात पडतात. कारण प्रेम आणि विश्वास या जगातील अशा दोन गोष्टी आहेत ज्या अशक्य देखील शक्य करून दाखवतात. आयुष्य म्हटलं की, नाते संबंधांची कसोटी ही आलीच. ही कसोटी अग्नीवर तावून सुलाखून निघणार्या सोन्यासारखी असते. प्रतिकूल परिस्थितीत नात्यांची कसोटी नात्यातील ऋणानुबंधाचे धागे मजबूत करते.
असंच एक नातं जुळतं जेंव्हा अवखळ, गावात वाढलेली, हिरव्यागार रानात रमलेली संजीवनी रणजीतला भेटते. यानंतर तिच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते. आपल्याच माणसाने घेतलेल्या एका निर्णयामुळे फुलपाखरासारखे आयुष्य जगणार्या संजीवनीसमोर अनेक प्रश्न उभे राहतात. काय घडतं संजीवनी – रणजीतच्या गोष्टीमध्ये जाणून घेण्यासाठी या सगळ्या रंजक घडामोडी ‘राजा रानीची गं जोडी’ १८ डिसेंबर पासून रसिकांना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मालिका सांगलीमध्ये शूट होणार आहे. शिवानी सोनार संजीवनीची भूमिका आणि नवोदित मनीराज पवार रणजीतची भूमिका साकारणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी गोखले देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.