महाभारताच्या पार्श्वभूमीवर एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या मालिकेत छोट्या पडद्यावरचे अनेक प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळणार आहेत. या मालिकेसाठी आतापर्यंत गौतम गुलाटी, मदिराक्षी मुंडले यांसारख्या कलाकारांची निवड करण्यात आली आहे. ते दोघे या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
महाभारताच्या पार्श्वभूमीवरील ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत सामाजिक प्रथेच्या विरोधात जाऊन जातीबाहेर टाकलेल्या राजा कर्णशी लग्न करणाऱ्या उरुवीची कथा सादर करण्यात आली आहे. महाकाव्य महाभारताची माहिती नसलेली बाजू या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यात कर्ण, उरुवी आणि अर्जुनाच्या प्रेमाच्या त्रिकोणाबद्दल प्रेक्षकांना जाणून घेता येणार आहे. महाभारताच्या पार्श्वभूमीवरील कर्णसंगिनी ही मालिका कविता काणे यांची प्रसिद्ध कादंबरी कर्णाज वाईफः द आऊटकास्ट क्वीन वर बेतलेली आहे. कधीही सांगण्यात न आलेल्या कर्ण आणि त्याची जोडीदार उरुवीच्या या कथेमधून सर्व सामाजिक आणि वर्गांच्या मर्यादा लांघणारी प्रेमकथा पाहायला मिळेल.
अर्जुन हा महान योद्धा त्या काळातील सर्वांत सुयोग्य असा वर होता. तो या कथेत एका प्रेमीच्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तरूण अर्जुनाचे राजकन्या उरुवीवर प्रेम होते, हीच कधीही न ऐकलेली कथा प्रेक्षकांना या मालिकेद्वारे जाणून घेता येणार आहे. प्रेक्षकांना अर्जुनच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू या मालिकेद्वारे पाहायला मिळणार असल्याचे मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे.
देखणा अभिनेता किंशुक वैद्य ‘कर्णसंगिनी’ या मालिकेत अर्जुनाची भूमिका साकारणार आहे. त्याची ही व्यक्तिरेखा त्याच्या आधीच्या भूमिकांपेक्षा खूपच वेगळी असून धनुर्विद्येत पारंगत असलेल्या या योद्धाची कथा प्रेक्षकांच्या समोर आणण्यासाठी किंशुक खूपच उत्सुक आहे. या आव्हानात्मक भूमिकेला न्याय देण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. या भूमिकेसाठी सध्या तो त्यांचा पूर्ण वेळ देत आहे. स्टार प्लसवरील आगामी भव्य मालिका कर्णसंगिनीमध्ये विभिन्न व्यक्तिरेखांमध्ये नावाजलेले कलाकार एका वेगळ्याच रूपात दिसणार आहेत.
‘कर्णसंगिनी’ या मालिकेच्या पहिल्या भागाच्या कथेचे निवेदन करण्यासाठी निर्मात्यांनी राधिका आपटे या अभिनेत्रीची निवड केली असल्याची चर्चा आहे.