महिला सहकलाकारांविरोधात टीका तसेच गैरवर्तणूकीच्या कारणावरून मुलगी झाली हो मालिकेतून अभिनेते किरण माने यांना काढून टाकण्यात आले होते. यावरून राज्यभरात वाद उद्भवला होता. किरण माने हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. आता या वादावर पडदा पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
राजकीय पोस्ट केल्यामुळे आपल्याला मालिकेतून काढल्याचा आरोप किरण माने यांनी केला होता. यामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. अभिनेत्यांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते, असा सूर होता. परंतू वाद वाढल्याने स्टार प्रवाहने माने यांना का काढले याचे कारण समोर केले होते. त्यानंतर मालिकेतील सहकलाकारांमध्ये दोन गटही दिसून आले होते.
शरद पवारांच्या भेटीनंतर आज किरण माने, स्टार प्रवाहचे सतीश राजवाडे मंत्री जितेंद्र आव्हाड यांना भेटण्यासाठी शासकीय बंगल्यावर आले आहेत. महत्वाचे म्हणजे त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे खासदार आणि अभिनेते अमोल कोल्हेदेखील उपस्थित आहेत.
जितेंद्र आव्हाडांनी काही दिवसांपूर्वी किरण माने यांची बाजू घेतली होती. मुलगी झाली हो, या मालिकेतील अभिनेत्री श्वेता आंबीकर (आर्या), प्राजक्ता केळकर (कल्याणी) व शितल गीते (अक्षरा) यांच्या या बोलक्या प्रतिक्रियाच सांगतात की, किरण माने यांना सेटवरील वागणुकीमुळे नाही तर त्यांच्या सोशल मिडीयावरच्या लिखाणामुळे दबावतंत्र वापरुन मालिकेतुन काढले गेलंय, असे जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरन म्हटलं आहे.