Join us

'सिंधूताई माझी आई' मालिकेत किरण माने महत्वपूर्ण भूमिकेत, म्हणाले - खूप वर्षांनी प्रेरणादायी आयुष्य येतंय...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2023 6:09 PM

Kiran Mane : किरण माने लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. ते कलर्स मराठीवर दाखल होत असलेली नवीन मालिका 'सिंधूताई माझी आई'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता किरण माने (Kiran Mane) सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे कलाविश्वापासून समाजापर्यंत कोणतीही एखादी घटना घडली की त्यावर उघडपणे ते भाष्य करतात. त्यामुळे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ते कायम चर्चेत येत असतात. दरम्यान आता किरण माने लवकरच छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. ते कलर्स मराठीवर दाखल होत असलेली नवीन मालिका 'सिंधूताई माझी आई'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. नुकतेच त्यांनी या मालिकेचा प्रोमो शेअर करत याबद्दल चाहत्यांना सांगितले आहे. 

किरण मानेंनी 'सिंधूताई माझी आई' मालिकेचा प्रोमो शेअर करत लिहिले की, ...आपल्या एखाद्या भुमिकेतनं, आपल्या चाहत्या प्रेक्षकांचं जगणं समृद्ध व्हावं, अशी माझी लै इच्छा होती. आता ती संधी देणारं कॅरॅक्टर मी घेऊन येतोय... सिंधूताईंसारख्या महान व्यक्तीला घडवणारा 'रियल लाईफ हिरो'...सिंधूताईंच्या आयुष्यातला 'बाप'माणूस अभिमान साठे ! ज्याकाळात मुलांच्या बरोबर बसून मुलीनं शिकणं म्हणजे कमीपणाचं मानलं जायचं... पाप मानलं जायचं... त्याकाळात 'माझ्या पोरीत काहीतरी जगावेगळं आहे. तिनं शिकावं. मोठ्ठं व्हावं. तिच्या गुणांना वाव मिळाला तर ती खूप नांव कमावेल', हे या जगावेगळ्या बापानं ओळखलं होतं !

ते पुढे म्हणाले की, ...संत तुकोबारायाच्या विचारांवर चालणार्‍या या गरीब, कष्टाळू माळकरी माणसाच्या मार्गात पहाडाएवढ्या अडचणी आल्या... संकटांचा वर्षाव झाला... पण हार मानली नाही त्यानं. "फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर... नामाचा गजर सोडू नये !" या भावनेनं विपरीत परिस्थितीशी झुंज देत राहिला. त्याच्या संघर्षाचंच पुढे जाऊन त्या मुलीनं सोनं केलं!

सिंधुताईंचं आयुष्यही लै लै लै भयाण संघर्षात गेलंय. आईलाही नकोशी असलेली 'चिंधी' ते अनाथांना हवीहवीशी माय 'सिंधूताई', हा प्रवास वाटतो तेवढा साधासोपा नाहीये. मालिकाविश्वात खूप वर्षांनी खरंखुरं, तरल, भावस्पर्शी, प्रेरणादायी आयुष्य येतंय... 'कलर्स मराठी'वर, १५ ऑगस्टपासून, संध्याकाळी ७ वाजता 'सिंधुताई माझी माई'... नक्की बघा... आपल्या मुलामुलींना तर आवर्जुन दाखवा.., असे आवाहनही किरण मानेंनी केले. 

टॅग्स :किरण माने