Join us

kiran Mane: राजकीय भूमिका नाही तर व्यावसायिक कारणामुळे किरण मानेंना केलं मालिकेतून बाहेर, निर्मात्यांनी केलं स्पष्ट   

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 7:14 PM

kiran Mane: अभिनेते किरण माने यांना मालिकेतून बाहेर काढण्याच्या विषयावरून सुरू असलेल्या दाव्या प्रतिदाव्यांदरम्यान Mulgi Zali Ho मालिकेच्या निर्मात्यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. किरण माने यांना राजकीय भूमिकेमुळे नाही तर प्रोफेशनल कारणांमुळे मालिकेतून बाहेर करण्यात आल्याचा दावा मालिकेच्या निर्मात्यांनी केला आहे.

मुंबई - स्टार प्रवाह या वाहिनीवरील मुलगी झाली हो या  लोकप्रिय मालिकेतील कलाकार किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर किरण माने यांनी राजकीय भूमिकेमुळे आपल्याला मालिकेतून बाहेर काढण्यात आल्याचा दावा केला होता. किरण मानेंच्या या दाव्यानंतर अनेक नेत्यांसह विविध क्षेत्रातील मंडळी त्यांच्या पाठिंब्यासाठी उभे राहिल्याने आता या विषयाला राजकीय वळण लागले आहे. आज दिवसभर या विषयावरून सुरू असलेल्या दाव्या प्रतिदाव्यांदरम्यान मुलगी झाली हो, मालिकेच्या निर्मात्यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. किरण माने यांना राजकीय भूमिकेमुळे नाही तर प्रोफेशनल कारणांमुळे मालिकेतून बाहेर करण्यात आल्याचा दावा मालिकेच्या निर्मात्यांनी केला आहे.

याबाबतचे वृत्त बीबीसी मराठीने दिले आहे. या वृत्तानुसार मालिकेच्या निर्मात्या सुझाना घई यांनी किरण मानेंना मालिकेतून बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, किरण माने यांना त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे नाही तर प्रोफेशनल कारणांमुळे मालिकेमधून काढण्यात आले. किरण मानेंच्या राजकीय भूमिकेचा आणि त्यांना मालिकेतून काढण्याचा काहीही संबंध नाही. किरण माने यांना प्रोफेशनल कारणांमुळे मालिकेतून रिप्लेस करण्यात आले. ही प्रोफेशनल कारणे काय होती हे किरण माने यांना माहित होते. माने यांना त्याची अनेकदा माहिती दिली गेली होती. त्यांना अनेकदा सांगूनही त्या कारणांवर तोडगा निघाला नाही. त्यामुळे आम्हाला हा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, किरण माने यांनीही आपली भूमिका मांडताना शूटिंग संपल्यानंतर निर्मिती संस्थेकडून आपल्याला अचानकपणे मालिकेतून बाहेर करण्याचे सांगण्यात आल्याचे सांगितले. एका महिलेने मी राजकीय पोस्ट करतो त्यामुळे माझ्याविरोधात तक्रार केली होती, असे चॅनेलमध्ये काम करणाऱ्या एका मित्राने सांगितले, असा दावाही किरण माने यांनी केला. तसेच आपण पुरोगामी विचार मांडतच राहणार, असे किरण माने यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, किरण माने यांना तडकाफडकी मालिकेतून काढून टाकण्यात आल्यानंतर या विषयाने राजकीय वळण घेतले होते. काँग्रेसचे नेते सचिन सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, राज्य सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी किरण माने यांच्या समर्थनार्थ पुढे आले होते. 

 

टॅग्स :किरण मानेस्टार प्रवाहराजकारणमहाराष्ट्र