Join us

'असा बाप आम्हाला पाहिजे होता'; तृतीयपंथीयांच्या वक्तव्याने भारावून गेले किरण माने; नेमकं घडलं तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2023 12:59 PM

Kiran mane: किरण माने यांचं वक्तव्य सध्या चर्चेत येत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे किरण माने (kiran mane). उत्तम अभिनयासह स्पष्टवक्तेपणामुळेही किरण माने सातत्याने चर्चेत येत असतात. यात बऱ्याचदा ते समाजात घडणाऱ्या घटना, त्यांच्या जीवनातील लहानमोठे किस्से ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. अलिकडेच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांना आलेल्या तृतीयपंथीयांच्या अनुभवाविषयी भाष्य केलं.

"...आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या अनोख्या चाहत्यांनी दसर्‍याच्या आदल्या दिवशीच माझा दिवस सोन्याचा केला ! काल अचानक काही तृतीयपंथी लोक अत्यंत प्रेमानं, आवर्जुन, खास माझा पत्ता शोधत मला भेटायला आले. मला पाहून भारावून बोलू लागले, "किरणजी,तुमच्या भुमिका आमच्या काळजात कोरल्यात आम्ही. विलास पाटील आणि सिंधुताईंचे वडील पाहिल्यानंतर कायम वाटायचं असा बाप आम्हाला लाभायला पाहिजे होता. मलाही चिंधीसारखीच शिकायची आवड होती. बिगबॉसमध्ये असताना तुम्हाला खूप व्होटिंग केलं आम्ही...." ऐकताना माझे डोळे पाणावत होते. खास माझ्यासाठी खंडोबाच्या गाण्यावर त्यांनी डान्स केला", असं किरण माने म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "आम्ही वरचेवर तुम्हाला भेटायला येऊ. प्रत्येक वेळी यशाची पायरी वर चढलेली दिसणार आहे आम्हाला. तुम्ही खूप खूप मोठे व्हाल... सुपरस्टार व्हाल. जगात नांव होईल. आमचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहेत." असं म्हणून लाखमोलाचा आशिर्वाद देऊन गेले...बाकी कायबी असो भावांनो, ही अशी माया लै कमीजणांना लाभते. फॅन्सच्या 'लाईव्ह' प्रेमाबाबतीत मी लै लै म्हंजे लैच भाग्यवान हाय ! कलाकार आहे मी. जसे चाहते आहेत, तसे काही निंदक, ट्रोलही आहेत... पण माझा द्वेष करणार्‍यांचा मला जरासुद्धा राग येत नाही... कारण त्यांच्यामुळंच तर माझ्या चाहत्यांच्या अफाट प्रेमाची किंमत किती मोलाची आहे, हे मला कळतंय. बहुत छोटे हैं मुझ से मेरे दुश्मन.. जो मेरे चाहनेवाले हैं, मुझ से बड़ॆ है !

टॅग्स :किरण मानेमराठी अभिनेतासेलिब्रिटीटेलिव्हिजन