सध्या महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात मुसळधार पावसाने थैमान घातलंय. मुसळधार पावसामुळे देशात दोन मोठ्या एअरपोर्ट दुर्घटना झाल्या आहेत. दिल्लीतील एअरपोर्ट दुर्घटना ताजी असतानाच जबलपूरमध्ये छत कोसळल्याने मोठं नुकसान झाल्याची गोष्ट समोर आलीय. जबलपूरमध्ये ४५० कोटी रुपये खर्च करुन नव्यानेच बांधण्यात आलेल्या डुमना एअरपोर्टचं प्रचंड नुकसान झालंय. याविषयी अभिनेते किरण मानेंनी लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे.
किरण माने जबलपूर दुर्घटनेवर काय म्हणाले
किरण माने यांनी जबलपूर दुर्घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. त्याखाली कॅप्शन लिहिलंय की, "प्रभू श्रीरामसुद्धा छप्पर फाडके द्यायला लागलाय. आधी मंदिर गळती सुरू झाली... आता जबलपूर एअरपोर्टचं छप्पर फाडून विकास दणकन् खाली आलाय. याचं उद्घाटनही त्याच अवतारी महापुरूषानं केलं होतं म्हणे...." अशाप्रकारे कोणाचंही नाव न घेता किरण मानेंनी सरकारवर अप्रत्यक्ष केलेली दिसतेय.
जबलपूर एअरपोर्ट दुर्घटना
मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये ४५० कोटी रुपये खर्चून नव्याने बांधण्यात आलेला डुमना एअरपोर्ट पहिल्या पावसात तग धरू शकला नाही. विमानतळाच्या टर्मिनस इमारतीच्या समोर बसवलेले टेन्साइल छत पहिल्याच पावसाच्या पाण्यामुळे कोसळले. त्यामुळे अधिकाऱ्याच्या गाडीचे पूर्ण नुकसान झाले. वरिष्ठ प्राप्तिकर अधिकारी आणि त्यांचा ड्रायव्हर यातून थोडक्यात वाचले. कारण ही दुर्घटना होण्याआधी ते नुकतेच कारमधून बाहेर पडले होते. अधिकाऱ्यांची MP 20 ZC 5496 ही कार डॅमेज झाल्याचं दिसून येतंय. एअरपोर्टवर वर्दळ कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.