Join us

'प्रोटीन पावडरी घेऊन, इंजेक्शनं टोचून...', पुण्यात तरुणीचा जीव वाचवणाऱ्या लेशपालचं किरण मानेंनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 1:40 PM

Kiran Mane : किरण माने आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. दरम्यान आता त्यांनी इंस्टाग्रामवर लेशपाल जवळगेच्या धाडसाचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.

महाविद्यालयीन तरुणीवर पुण्यातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला करण्यात आला. यावेळी त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या लेशपाल जवळगे आणि त्याचा मित्र या दोघांनी हिम्मत दाखवत पुढे आले आणि माथेफिरू तरुणाला पकडले. त्यांनी आणि लोकांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. या दोघांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. दरम्यान आता लेशपालच्या कामगिरीची अभिनेता किरण माने(Kiran Mane)नेदेखील सोशल मीडियावर प्रशंसा केली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

किरण माने आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. दरम्यान आता त्यांनी इंस्टाग्रामवर लेशपाल जवळगेचे दोन फोटो शेअर केले आहेत आणि लिहिले की, प्रोटीन पावडरी घेऊन, इंजेक्शनं टोचून जीममध्ये जाऊन दंडाच्या बेंडकुळ्या फुगवणार्‍यांपेक्षा, पुस्तकं वाचून मेंदूत मुरवलेला माणूस जास्त शौर्यवान, धैर्यवान आणि विद्वानही असतो, हे या भावानं दाखवून दिलं !तुझ्या भावी वाटचालीस शुभेच्छा लेशपाल. 

नेमकं काय घडलं?

पुण्यातील सदाशिव पेठेत मंगळवारी (ता.२७ जून) सकाळी दहा वाजण्याच्या पेरू गेट पोलीस चौकी पासून अवघ्या काही अंतरावर हा धक्कादायक प्रकार घडला. प्रेमाला नकार दिल्यामुळे चिडलेल्या तरुणाने या तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात तरुणी जखमी झाली असून तिच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेचा थरार आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सिनेस्टाईल थरारक घटनेत जखमी तरुणीसाठी दोन तरुणांनी जीवाची बाजी लावली. त्यामुळे, त्या तरुणीचा जीव वाचला. 

टॅग्स :किरण मानेपुणे