'मुलगी झाली हो' ही मालिका मराठीतील गाजलेल्या मालिकांपैकी एक. या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं. किरण माने, दिव्या पुगावकर, सविता मालपेकर, योगेश सोहोनी अशी या मालिकेची स्टारकास्ट होती. ही मालिका तेलुगु मालिकेचा रिमेक होती. या मालिकेत किरण मानेंनी साकारलेली विलास पाटील ही भूमिका चांगलीच गाजली. यातील किरण मानेंचा अभिनय पाहून साऊथ स्टारने त्यांना थेट मेसेज करत त्यांचं कौतुक केलं होतं. हा किस्सा किरण मानेंनी सांगितला आहे.
किरण मानेंनी त्यांच्या सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये साऊथ अभिनेता साक्षी शिवाने त्यांना मेसेज करत कौतुक केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ५ वर्षांपूर्वीचा हा किस्सा त्यांनी शेअर केला आहे.
किरण मानेंची पोस्ट
‘मुलगी झाली हो’या मालिकेतली माझी विलास पाटील ही भुमिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती. एक दिवस अचानक माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला, “U have acted better than me brother . Very much impressed - Sakshi Shiva”
साऊथचा एक ग्रेट ॲक्टर ‘साक्षी शिवा’ याचा तो मेसेज होता! एका नावाजलेल्या तेलूगू अभिनेत्यानं माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला दाद दिलीय, यावर माझा विश्वासच बसेना. तो साक्षी शिवाचाच मेसेज आहे याची खात्री झाल्यावर लै लै लै आनंद झाला...काय करू, कुणाला सांगू, काय रिप्लाय देऊ काही सुचेना झालं... डोळ्यांत पाणी आलं!
पाच वर्षांपूर्वीची ही आठवण…
‘मुलगी झाली हो’ ही मालिका आधी तेलूगूमध्ये ‘स्टार मा’वर सुरू झाली होती. ‘मौनरागम’ नावानं. साऊथला लोकप्रियतेचे सगळे उच्चांक त्या मालिकेनं तोडले होते. मी साकारत असलेली ‘विलास पाटील’ची भुमिका ‘सिनैय्या’ नांवानं तेलूगूमध्ये साकारणारा हा अभिनेता साक्षी शिवा. आपण तेलूगूत केलेला रोल मराठीत कोण करतंय या कुतूहलानं त्यानं आपली मराठी सिरियल बघायला सुरूवात केली होती...
साऊथ इंडस्ट्री का ग्रेट आहे, यावर बर्याचदा चर्चा सुरू असते. कारणं अनेक आहेत. पण तिथल्या अभिनेत्यांना एकमेकांविषयी आदर असणं हा गुण आपल्याला नेहमी दिसतो. साक्षी शिवानं मला मेसेज केला नसता तरी त्याच्या करीयरला काहीही फरक पडला नसता... पण तरीही त्यानं नितळ मनानं हे कौतुक केलं. आपल्याकडं समोरुन कायतरी फायदा अपेक्षित असल्याशिवाय कौतुक नसतं.
अर्थात मराठीमध्ये काही चांगले, दिलदार, प्रतिभावान, कदरदान लोकही आहेत. फक्त त्यांची संख्या आणि ताकद वाढो हीच अपेक्षा.
साक्षी शिवा... लब्यु भावा.❤️
किरण मानेंनी 'मुलगी झाली हो' मालिकेतून काही कारणांमुळे एक्झिट घेतली होती. त्यानंतर ते अनेक मालिका आणि काही सिनेमांमध्येही दिसले. 'बिग बॉस मराठी'मुळे ते चर्चेत आले होते.