Join us

BMWच्या नेमप्लेटवर 'जय भीम' लिहिणाऱ्या ऑस्ट्रेलियातील 'त्या' व्यक्तीचा फोटो किरण मानेंनी केला शेअर, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 18:08 IST

"हे प्रेम फक्त गाडीवर जयभीम लिहिण्यापुरतं...", किरण मानेंची पोस्ट व्हायरल

किरण माने हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. अनेक मालिका आणि नाटकांमध्ये त्यांनी काम केलं आहे. ते सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. किरण मानेंच्या अशाच एका पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 

किरण मानेंनी ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्यक्तीची बीएमडब्ल्यू सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. बीएमडब्ल्यूच्या नेमप्लेटवर या व्यक्तीने जय भीम असं लिहिलं आहे. हा फोटो शेअर करत किरण मानेंनी खास पोस्ट लिहिली आहे. 

किरण मानेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं? 

'जयभीम'... कसं थाटात आन् टेचात लिहलंय नंबरप्लेटवर.ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या आपल्या दोस्ताची बीएमडब्ल्यू हाय ही भावांनो !

...मला आलेल्या फ्रेन्ड रिक्वेस्ट मी शक्यतो तपासून ॲक्सेप्ट करतो. अशीच एक रिक्वेस्ट आली. त्यावर ह्यो नादखुळा फोटो दिसला. नवल वाटलं. पोस्ट पाहिली, तर आंबेडकर जयंतीची ही पोस्ट होती. त्यावर कॅप्शन लिहीलीवती, 'बापाचा दिवस नसतो. आपला प्रत्येक दिवस त्या बापामुळेच असतो.'... क्युरीऑसिटी वाढली. या भन्नाट मानसाशी संपर्क साधला. दूर असला तरी हा आपला हमदम, हम-नफ़स निघनार याची खात्री होतीच, ती पक्की झाली. म्हणला, 'तुम्ही समविचारी आहात, म्हणून मैत्रीचा हात पुढं केला.'

अमित भुतांगे ! नागपूरचा. सध्या ॲडलेड इथं फिजीओथेरपीस्ट म्हणून नाव कमावतोय. तिथंच स्थायिक झालाय. निव्वळ टॅलेंटच्या बळावर मोठा झालाय...ऐश्वर्यसंपन्न झालाय...पन तरीबी आपली पाळंमुळं इसरलेला नाय. आपल्या शिक्षणाचा पाया ज्याच्यामुळं घातला गेला, त्या बापाला काळजात जपून ठेवलंय. 'आपन खातो त्या भाकरीवरच नाय, तर ब्रेड-बटर, पिझ्झा-बर्गरवरबी बाबासायबांचीच सही हाय' याची जानीव ठेवलीय.

हे प्रेम फक्त गाडीवर 'जयभीम' लिहण्यापुरतं नाय बरं का...आपल्यापैकी बऱ्याचजनांना वाटलं, त्यात काय विशेष? लै जन अशी महामानवांची नावं गाडीवर लिहित्यात. म्हणून त्यापुढं जाऊन या मानसाविषयी मी जानून घेतलं, आन् नंतर खर्‍या अर्थानं भारावलो. आज ऑस्ट्रेलियात व्यवसाय भरभराटीच्या शिखरावर असूनबी अमितनं बाबासाहेबांचा आदर्श घेत, सामाजिक भान जपलंय. इंडीयामधल्या उपेक्षित, वंचित समाजातल्या हुशार पोरांना हेरून, त्यांना करीयर गायडन्स करणं...उच्च शिक्षणासाठी परदेशी विद्यापीठांमध्ये संधी मिळवून देणं, अशी कामं मनापास्नं आनि आनंदानं करतो हा आपला दोस्त !

शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांचे 'खरेखुरे' विचार ज्यानं मनामेंदूत मुरवून घेतलेत, तो कुठल्याही क्षेत्रात जाऊदेत...कुठल्याही प्रांतात जाऊदेत... कुठल्याही देशात जाऊदेत...न डरता, न लाजता, कुनाचीबी भिडभाड न ठेवता आपल्या महामानवांच्या विचारांचा दरवळ पसरवनार... हे जग सुंदर करणार !सलाम मित्रा अमित. लब्यू लैच. जय शिवराय...जय भीम !

किरण मानेंची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. सध्या किरण माने 'सिंधुताई माझी माय'या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. 

टॅग्स :किरण मानेटिव्ही कलाकारमराठी अभिनेता