कलाविश्वातील कलाकारांची दोस्ती हा चर्चेचा विषय असतो. एकाच क्षेत्रात काम करता करता अनेक कलाकार एकमेकांचे जिगरी दोस्त बनतात. बॉलिवूडप्रमाणे मराठी कलाविश्वातही कलाकारांच्या मैत्रीचे अनेक किस्से आहेत. प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम आणि 'बिग बॉस' फेम किरण माने एकमेकांचे जिगरी दोस्त आहेत. नुकताच किशोर कदम यांचा वाढदिवस झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त किरण मानेंनी खास पोस्ट शेअर केली आहे.
किशोर कदम यांच्यासाठी किरण मानेंची पोस्ट
किशोर, आपल्या मैत्रीला सत्तावीस वर्ष होतील. जवळजवळ तीन दशकांतले एकमेकांच्या आयुष्यातले लय चढऊतार आपण बघितलेत. वीस-बावीस वर्षांपूर्वींचा एक काळ असा होता की मी घरच्या परिस्थितीमुळे अभिनयात करिअरचं स्वप्न गुंडाळून, सगळं सोडून सातारला येऊन राहिलो होतो. काम सुरू झालं. 'आता आपण अभिनयात करिअर करू शकणार नाही.' या विचारांनी मन-मेंदू पोखरून निघालं होतं. घुसमटलो होतो. एक दिवस दुकानासमोरनं मुंबईच्या एका व्यावसायिक नाटकाची गाडी पास झाली. किशोर, ती आपली 'सुयोग' नाटककंपनीची गाडी होती! ती गाडी बघितली आन् लै आठवणी जाग्या झाल्या... तू, मी, अतुल कुलकर्णी, भक्तीताई आपण त्या गाडीतनं 'गांधी विरूद्ध गांधी' नाटकाचे महाराष्ट्रभर दौरे केलेले आठवले! हे सगळं हरवलं कायमचं, या वेदनेनं कळवळलो. तिथनं थेट एका बारमध्ये गेलो. असं वाटलं आता डोकं शांत होईल. कशाचं काय? उलट डोक्यात भडका उडाला. घरी आलो...टेरेसवर जाऊन एकटाच ढसाढसा रडलो.
बरोब्बर दूसर्याच दिवशी अचानक तुझा फोन आला. "किरन्या, किशोर बोलतोय." त्यापूर्वी दोन वर्ष आपला एकमेकांशी कसलाबी संपर्क नव्हता. "आयला. किशोरच्या लक्षात हाय आपन!!??".. तू म्हणालास "किरण्या, मी एक सिनेमा दिग्दर्शित करतोय. रंगनाथ पाठारेंच्या कादंबरीवर आधारीत हाय. त्यात एक खूप महत्त्वाच्या रोलसाठी मला तू हवायस. पुण्यात भेटायला ये... थांब थांब.. मीच तुला न्यायला येतो.कुठं येऊ सांग." तू खरंच मला न्यायला आलास. पुण्यातल्या ऑफिसमध्ये सिनेमाचं वाचन झालं. जरी त्या सिनेमाचं पुढं काही कारणांनी शुटिंग होऊ शकलं नाही, तरी त्या एका घटनेनं माझ्या मनाला लै लै लै उभारी दिली किशोर !
लै लै लै जबराट क्षण जगलो तुझ्यासोबत किशोर. आज तू 'सौमित्र' म्हणून उभ्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहेस.. पण आपली मैत्री झाली त्यावेळी तू लै फेमस नव्हतास.. तू अचानक सातारला यायचास..मग आपण कास पठारावर रात्रभर चांदण्यात 'बसायचो'... कधी बामणोलीच्या रिसाॅर्टवर दोन दोन दिवस रहायचो.. आत्ता तुझ्या ज्या कविता महाराष्ट्राला पाठ आहेत, त्या खूप वर्ष आधी जन्मल्या-जन्मल्या ऐकायचं सुख मला लाभलंय ! तुझ्यामुळं माझ्या आयुष्यात 'गुलज़ार' आला.. 'जावेद अख्तर' आला.. 'निदा फ़ाज़ली ' आला..
तुझं कवितांचं पहिलं पुस्तक पाॅप्यूलरनं प्रकाशित केलं होतं '...आणि तरीही मी' ! ते मला भेट देताना तू त्यावर लिहीलंस, "प्रिय किरण, माझ्या कवितांवर माझ्याइतकंच प्रेम करतोस. जर आपल्या आयुष्यात 'गांधी' नसते आले तर? तरी कुठेतरी भेटलो असतोच आणि असेच मित्र असतो ! - किशोर."
किशोर, वाढदिवसाच्या लै लै लै शुभेच्छा. लब्यू. लब्यू लैच !
किरण मानेंच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट करत किशोर कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. किरण मानेंनी किशोर कदमांबरोबरचे काही फोटोही शेअर केले आहेत.