अभिनयाव्यतिरिक्त स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane). आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर अभिनेता सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. दरम्यान आता त्यांनी सोशल मीडियावर साताऱ्यातील थिएटरच्या अवस्थेवर भाष्य केले आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.
किरण माने यांनी इंस्टाग्रामवर साताऱ्यातील थिएटरवर भाष्य केले आहे. त्यांनी लिहिले की, वाॅSSSव कस्लं भारीय हे !" सातारा स्टँडजवळ झालेल्या चकचकीत सेव्हन स्टार 'आयआरके मल्टीप्लेक्स'मध्ये पहिल्यांदा सिनेमा बघायला गेलो होतो तेव्हा माझी पोरगी म्हणाली होती... तिनं असं म्हणताच माझं मन धावत तीस वर्ष मागं गेलं... त्यावेळी मी तिच्या वयाचा होतो... मायणीच्या तंबूत सिनेमा पहात मोठा झालेला मी, त्यावेळची सातार्यातली 'बांधीव थेटरं' बघून असाच भारावलो होतो !...सातार्यातली ती सगळी सिंगल स्क्रीन थिएटर्स आठवली. पंचवीस तीस वर्ष जिथं दिवसभर माणसांचा गजबजाट, शिट्ट्या टाळ्या हशाचा गजर असायचा... त्या वास्तू आज कुणाचीतरी वाट पहात असल्यासारख्या भग्न, भकास, उदास उभ्या असल्याचं आठवून कसंतरीच झालं.ते पुढे म्हणाले की, प्रभात आणि चित्रा टाॅकीज म्हणजे जुने सिनेमे ! आमच्या वडिलांच्या काळातले राज कपूर-दिलीपकुमार-देव आनंद आणि राजेश खन्ना आम्हाला इथंच भेटले. जयविजय टाॅकीज मराठमोळं. दादा कोंडके-निळूभाऊ-अशोकमामा-लक्ष्या... आजही जयविजयकडं पाहिलं की 'माहेरची साडी'साठी सकाळी सातपासून बायकांनी लावलेल्या रांगा आणि 'अशी ही बनवाबनवी' पहातानाचे हास्यकल्लोळ आठवतात ! आमच्या 'त्या' नाजूक वयात चावट इंग्लीश पिच्चरचे 'माॅर्निंग शो'ज म्हणजे पर्वणीच ! 'सिरोक्को' आणि 'आयरीस' या दोन सेक्सी पिच्चरनी शोलेपेक्षा जास्त धंदा केला सातार्यात...समर्थ टाॅकीजची अविस्मरणीय आठवण म्हणजे, तिथं माझ्या 'ऑन ड्यूटी चोवीस तास' सिनेमाचं पोस्टर लागलंवतं. आयुष्यात पहिल्यांदा पोस्टरवर झळकलोवतो. कलाकारांच्या यादीत '...आणि सातारचा सुपुत्र किरण माने' असं रंगवलं होतं. ते पाहुन भरून आलंवतं ! ज्या पडद्यावर 'मुकद्दर का सिकंदर' पासून 'अग्नीपथ' पर्यन्त बच्चनच्या एन्ट्रीला थेटर दणाणून सोडलं... त्याच पडद्यावर मी दिसलो तवा सातार्यातल्या दोस्तलोकांनी शिट्ट्या वाजवून थेटर डोक्यावर घेतलंवतं....आणि राधिका टाॅकिज ! राधिका म्हन्लं की 'हिम्मतवाला' आठवतो, 'कर्मा' आठवतो... आखरी रास्ता, जांबाज, मैने प्यार किया, हम आपके है कौन, डर पासून सत्या, रंगीला, मुन्नाभाई...लै लै लै काय-काय आठवतं ! राधिका लै जगली... पण शेवटी 'बाजीराव मस्तानी'चा हाऊसफुल्ल शो दाखवून तिनंही शेवटचा श्वास घेतला...