दादा कोंडके हे विनोदाचे बादशहा म्हणून ओळखले जातात. त्यांनी त्यांच्या काळात चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. त्यांनी एकापेक्षा एक हिट चित्रपट चित्रपटसृष्टीला दिले. त्यांच्या अनेक भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगल्याच लक्षात आहेत. वूटच्या 'अनसीन अनदेखा'च्या नवीन क्लिपमध्ये अभिजीत बिचुकले आणि किशोरी शहाणे मराठी चित्रपटसृष्टीचे सर्वात प्रख्यात व्यक्तिमत्त्व असलेले 'दादा कोंडके' यांची आठवण काढताना दिसत आहेत.
या दिग्गज मराठी अभिनेता आणि चित्रपट निर्मात्याची प्रशंसा करत बिचुकले म्हणतो, ''दादा कोंडके हे एक वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. ते स्वत:च चित्रपटाची गाणी लिहायचे, चित्रपटाची कथा लिहायचे, स्वत: चित्रपट दिग्दर्शित करायचे. त्यांचे सगळेच चित्रपट अतिशय सुंदर होते. त्यांनी महाराष्ट्राला भरभरून हसवलं. ते अतिशय हुशार होते. बिग बॉसच्या निमित्ताने मी सगळ्यांसमोर आज त्यांना वंदन करत आहे.”
हे ऐकून किशोरी शहाणे जुन्या आठवणींमध्ये रमल्या. त्यांनी दादा कोंडके यांच्यासोबत त्यांच्या झालेल्या पहिल्या भेटीविषयी सांगितले. त्या म्हणाल्या, ''दादा कोंडकेचा पुतण्या विजय कोंडकेने 'माहेरची साडी' हा प्रसिद्ध चित्रपट बनवला होता. त्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना माझा वाढदिवस आला होता. तेव्हा दादा खास माझ्या वाढदिवसासाठी सेटवर आले होते आणि त्यांनी माझ्या बर्थडेचे सेलिब्रेशन केले होते. त्यांनी त्यावेळी मला एक घरात लावायचे मोठे घड्याळ गिफ्ट दिलं होतं. ते घड्याळ मी अजूनही जपून ठेवले आहे. ही गोष्ट १९९१ ची आहे. पण ते घड्याळ अजूनही एकदम व्यवस्थित सुरू आहे.”
बिचुकले हे ऐकून अचंबितच झाला. किशोरी शहाणे यांचे बोलणे ऐकल्यानंतर त्यांना नमस्कार करत तो म्हणाला, ''मला माहीतच नव्हतं, तुम्ही त्यांना भेटला आहात. क्या बात, क्या बात! तुम्ही मामांच्या (अशोक सराफ) लाडक्या आहात हे आम्ही अशोक सम्राटमध्ये बघितलेलं आहे. मामा विद्यापीठ आहेत पण दादा ग्रेट... कारण मला वाटतं मामांना सुद्धा दादांनीच संधी दिली होती.'' त्यावर किशोरी मान हलवत म्हणाल्या, ''खूप जणांना संधी दिली होती त्यांनी!”