सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवर ‘अजूनही बरसात आहे’ (Ajunhi Barsat Aahe) ही मालिका सध्या चांगलीच गाजतेय. मुक्ता बर्वेनी (Mukta Barve) साकारलेली मीरा आणि उमेश कामतने (Umesh Kamat) साकारलेला आदिनाथ यांची मस्तपैकी जुळून आलेली केमिस्ट्री पाहून चाहते या मालिकेच्या प्रेमात पडले आहेत. अल्पावधीत मालिका लोकप्रिय झाली आहे. मुक्ता व उमेश यांच्याशिवाय या मालिकेत अनेक कलाकार आहेत. सुहासिनी थत्ते, राजन ताम्हाणे, उमा सरदेशमुख, समिधा गुरू यांनीही अगदी दमदार अभिनय केला आहे. याच मालिकेत आणखी एक चेहरा आहे. तो म्हणजे मीराची मैत्रिण. ही भूमिका अभिनेत्री पल्लवी वैद्य (Pallavi Vaidya) हिने साकारली आहे.
पल्लवीच्या वाट्याला आलेली भूमिका छोटी असली तरी लक्षवेधी आहे. पल्लवीला याआधीही अनेक मालिकांमध्ये तुम्ही बघितले असेलच. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मालिकेत तिने पुतळा मातोश्रींची भूमिका साकारली होती. अनेक मराठी चित्रपटांतही ती झळकली आहे. गर्भ, झाले मोकळे आकाश या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. पल्लवीने ‘अगंबाई अरेच्चा!’ या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. या चित्रपटातून ती संजय नार्वेकर यांच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती. ‘चला हवा येऊ द्या’च्या मंचावरून तिने काही काळ प्रेक्षकांना हसवण्याचे काम केले होते. आता ती ‘अजुनही बरसात आहे’ या मालिकेत छोट्याशा भूमिकेत आहे.
या मालिकेशी तिचे आणखीही एक खास कनेक्शन आहे. होय, ‘अजूनही बरसात आहे’चे दिग्दर्शक केदार वैद्य हे पल्लवी वैद्यचे पती आहेत. केदार वैद्य हे मराठी चित्रपट, मालिका दिग्दर्शक आहेत. माझ्या नव-याची बायको, माझे पती सौभाग्यवती, झिपºया या मालिका आणि चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे. ‘अगंबाई अरेच्चा!’ या चित्रपटात त्यांनी सह- दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती. याच चित्रपटाच्या सेटवर त्यांची व पल्लवीची मैत्री झाली होती. ही मैत्री पुढे प्रेमात बदलली आणि नंतर दोघांनी लग्न केले.
तुम्हाला माहित नसेल पण या पल्लवीची बहिणही मराठी चित्रपटसृष्टीतील मोठी अभिनेत्री आहे. होय, पूर्णिमा भावे तळवळकर ही या पल्लवीची थोरली बहीण आहे. पूर्णिमा तळवळकर यांनी होणार ‘सून मी ह्या घरची’ या मालिकेतील बेबी आत्याची भूमिका साकारली होती.
‘क्यूँ रिश्तों में कट्टी बट्टी’ या हिंदी मालिकेत पूर्णिमा भावे महत्वाची भूमिका साकारत आहेत. शिवाय स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेतूनही त्या प्रेक्षकांसमोर येत आहेत.