‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasya Jatra ) या धम्माल विनोदी कार्यक्रमाचं नाव घेतलं तरी काही चेहरे डोळ्यांपुढे येतात. यातलाच एक चेहरा म्हणजे, अभिनेते अरूण कदम. या शोमध्ये अरूण कदम (Arun Kadam)आणि पंढरीनाथ उर्फ पॅडीची जोडी भल्याभल्यांना पुरून उरते. अरूण कदम यांचे आगरी भाषेतील विनोद प्रेक्षकांना खळखळून हसवतात. आज याच अरूण कदम यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गेल्या दोन दशकांपासून वेगवेगळ्या विनोदी भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणा-या अरूण कदम यांना ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या शोने नवी ओळख दिली. यानंतर अनेक कॉमेडी शोमध्ये ते दिसले. आगरी भाषेवर विशेष प्रभुत्व असलेल्या अरूण कदमांच्या तोंडून आगरी भाषा ऐकायला जाम भारी वाटते. केवळ कॉमेडी शो नाही तर अनेक मराठी सिनेमा आणि मराठी मालिकांमध्ये सुद्धा कामे केली आहेत.
ओवाळते भाऊराया, घंटा, जलसा, शिनमा, जस्ट गम्मत, सासूबाई गेल्या चोरीला, टाटा बिर्ला आणि लैला, थोरली बहीण अशा अनेक मराठी सिनेमातील त्यांच्या भूमिका गाजल्या.
अरूण यांनी मराठीच नाही तर बॉलिवूडच्या अनेक सिनेमातही काम केलं आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक असेल. 2009 मध्ये आलेला ‘बायपास’, 2011 मध्ये आलेला ‘दिल तो बच्चा है जी’, सनी देओलचा ‘काफिला’ अशा अनेक हिंदी चित्रपटात ते झळकले.
त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल सांगायचे तर त्यांच्या पत्नीचे नाव वैशाली कदम आहे. या दांम्पत्याला सुकन्या नावाची एक मुलगी आहे. सुकन्याचा नुकताच साखरपुडा पार पडला होता. अरूण कदम यांचा जावई बिअर क्षेत्रात हेड ब्रिवर म्हणून कार्यरत आहे. मुलगी सुकन्या ग्राफिक डिझायनर आहे.