झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिका हळूहळू निरोप घेताना दिसून येत आहेत. ‘माझा होशील ना’ (Majha Hoshil Na) ही मालिकाही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेतेय. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेमुळे आदित्य व सईची भूमिका साकारणा-या विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडेची फ्रेश जोडी घराघरात लोकप्रिय झाली. आदित्य-सईची हटके लव्हस्टोरी आणि मामाचं असणार सॉलिड कॉम्बिनेशन अशी भन्नाट कल्पना रंगवणा-या या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. यातलेच एक पात्र म्हणजे नकली आदित्य अर्थात मॉन्टी. मालिकेच्या अखेरच्या टप्प्यात या नकली आदित्यला व जेडीला पोलिसांच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. हे मॉन्टीचे पात्र कुणी साकारलेय, हे तुम्हाला ठाऊक आहे का? आज आम्ही त्याचबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
तर मालिकेत मालिकेत नकली आदित्य बनून आलेल्या मॉन्टीचे खरे नाव आहे सुजय हांडे. सुजय हांडे हे निर्मिती क्षेत्रात मोठे नाव आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेचे निर्माते म्हणूनही सुजय हांडे जबादारी सांभाळत आहे. टेल्स व ब्लाइंडनेस या चित्रपटाची त्यांनी निर्मिती केली आहे. त्यांची आणखी एक ओळख द्यायची झाल्यास ते मराठी चित्रपटसृष्टीतील एका दिग्गज कलाकाराचे सुपुत्र आहेत.
होय, प्रसिद्ध गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक अशोक हांडे यांचे सुजय हांडे हे सुपुत्र. अशोक हांडे आपल्या ‘चौरंग’ या त्यांच्या संस्थेमार्फत लोककलेला व नाट्यकलेला प्रोत्साहन देण्याचे कार्य करीत आहेत. अशोक हांडे यांनी मंगलगाणी-दंगलगाणी, आवाज की दुनिया, आजादी पचास, गाने सुहाने, स्वरलता, गंगा जमुना अनेक कार्यक्रम मराठी रंगभूमीवर सादर करून स्वत:ची एक आगळी-वेगळी ओळख निर्माण केली. ‘मराठी बाणा’ मधून अशोक हांडे महाराष्ट्राचे सांस्कृतिक जीवन डोळ्यांसमोर उभे करतात. इथले सण समारंभ, मग लग्न असो वा मंगळागौर, दहीहंडी असो वा गणपती पूजन सा-यांचा समावेश या कार्यक्रमात झाला आहे. आदिवासी, कोळी, पंढरपूरचे वारकरी ही सारी मंडळी इथे पहावयास मिळतात. त्यांच्या या कार्यक्रमाचे दोन हजाराहून अधिक प्रयोग प्रेक्षकांनी हाऊसफुल केले.
अशोक हांडे यांनी 1987 साली ‘चौरंग’ या संस्थेची निर्मिती केली होती. त्यांचा मुलगा सुजय हांडे या संस्थेत कार्यकारी निर्माता म्हणून काम सांभाळत आहेत. सोबतच मराठी मालिका निर्मिती क्षेत्रातसोबतच अभिनेता बनून ते प्रेक्षकांसमोर आला आहे. सुजय हे विवाहित आहेत. पारुल देवल हांडे ही त्यांची पत्नी कौसलिंग सायकॉलॉजिस्ट आणि आर्ट बेस्ड थेरपिस्ट आहे.