‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Majhi Tujhi Reshimgath) ही श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) व प्रार्थना बेहरेची (Prarthana Behere) मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. सध्या ही मालिका एका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत नेहाची वहिनी मीनाक्षी तिच्या लग्नासाठी एक स्थळ सुचवते. नेहाला पाहायला आलेला परांजपे हा पेशाने वकील असल्याचं मालिकेत दाखवलंय. अनेकांना पैशाचा गंडा घालणारा हा परांजपे नेहालाही आपल्या जाळ्यात फसवतो का? हे येत्या काही एपिसोडमध्ये दिसणार आहे. आज याच परांजपेची भूमिका साकारणा-या अभिनेत्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. अभिनेता चैतन्य चंद्रात्रे याने ही भूमिका साकारली आहे. याला तुम्ही ‘आभास हा’ या मालिकेतही पाहिलं असेल. ‘आभास हा’ मध्ये अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आणि चैतन्य मुख्य भूमिकेत होते.
याशिवाय, रुंजी, एका पेक्षा एक, कुलवधू, लेक लाडकी या घरची, शुगर सॉल्ट आणि प्रेम, फ्रेंड्स, गुलमोहर अशा चित्रपट आणि मालिकेतून त्याने वेगवेगळया भूमिका साकारल्या आहे. हा चैतन्य केवळ अभिनेता नाही तर ‘एबी व्हीएफएक्स स्टुडिओज्’चा सहसंस्थापकही आहे. होय, कौस्तुभ आठवले, कुमार गौरव आणि अभिषेक कुमार या मित्रांच्या मदतीने त्याने ‘एबी व्हीएफएक्स स्टुडिओज्’ सुरू केला. वाचून आश्चर्य वाटेल, पण या स्टुडिओनं मोठमोठ्या बॉलिवूड सिनेमांसाठी व्हिज्युअल इफेक्ट्सचं काम केलेय. इतकंच नाही काही हॉलिवूड सिनेमासाठीही काम केलं आहे. या यादीत सुल्तान, बाहुबली 2, धूम 3 या बॉलिवूड सिनेमांसोबतच कुंगफू योगा, रेसिडेंट एव्हील, फास्ट अँड फ्युरिअस अशा हॉलिवूड चित्रपटांचा समावेश आहे.
नेटफ्लिक्स सारख्या नामांकित ओटीटी प्लॅटफॉर्मच्या जाहिरातींचं काम देखील या स्टुडिओमार्फत करण्यात आलं आहे. व्हिज्युअल इफेक्टसचं महत्त्व वाचकांना नव्यानं सांगण्याची गरज नाही. पण वाटतं तितकं हे काम सोपं नाही.
अनेकदा 2 सेकंदाच्या सीनसाठी एक अख्खा दिवस घालवावा लागतो. चैतन्यच्या एबी व्हीएफएक्स स्टुडिओज्’ मध्ये हे काम अगदी कौशल्यानं होतं. अशी जवळपास ५० मराठी मुलं या स्टुडिओत काम करत आहेत. येत्या काळात ‘एबी व्हीएफएक्स स्टुडिओज्’ला भारतातील नंबर एकचा व्हिज्युअल इफेक्ट स्टुडिओ बनवण्याचा त्यांचा मानस आहे.