स्टॅण्ड अप कॉमेडीयन व अभिनेत्री विशाखा सुभेदार ( Vishakha Subhedar) हिची बातच न्यारी... विशाखा स्टेजवर आली रे आली की हास्याचे कारंजे फुटतात. फु बाई फु, कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा एक ना अनेक शोमधून विशाखाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अभिनय क्षेत्रात येण्याआधी लिपस्टिक, साड्या विकणारी विशाखा महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमध्ये झळकली आणि तिच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. यानंतर तिनं कधीच मागे वळून बघितलं नाही.
झपाटलेला 2, मस्त चाललंय आमचं, येड्यांची जत्रा, अरे आवाज कोणाचा, सासूच स्वयंवर, दगडाबाईची चाळ, ये रे ये रे पैसा अशा अनेक चित्रपटात तिला संधी मिळाली. अभिनयासोबतच विशाखा उत्कृष्ट नृत्यांगना देखील आहे.
विशाखाबद्दल सगळेच जाणतात. पण आज आम्ही तुम्हाला तिच्या पतीबद्दल सांगणार आहोत. ठाण्याची मुलगी झाली अंबरनाथची सून कशी झाली, ते सांगणार आहोत.तर विशाखाचे माहेरचे आडनाव शिंदे. ती मुळची ठाण्याची.
1998 साली अभिनेते आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले महेश सुभेदार यांच्यासोबत विशाखाने लग्नाच्या आणाभाका घेतल्या. लग्नानंतर ती अंबरनाथला शिफ्ट झाली. विशेष म्हणजे लग्नानंतरच विशाखाला अभिनेत्री म्हणून ओळख प्राप्त झाली आहे.
विशाखाचे पती महेश हे इंजिनिअरसुद्धा आहेत. अभिनेते अशी त्यांची ओळख आहे. तक्षक याग, लगी तो छगी, बेधुंद, अशी ही भाऊबीज, ही पोरगी कोणाची अशा मोजक्या नाटक आणि चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. विशाखा आणि महेश सुभेदार अंबरनाथ येथे स्थायिक आहेत. अभिनय हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. अभिनयला सुद्धा आपल्या आई वडिलांप्रमाणे अॅक्टिंगची आवड आहे.