दिवाळी म्हटले की, दिवाळीचा खमंग फराळ कसा विसरणार. पूर्वी दिवाळी तोंडावर आली की, घरोघरी दिवाळीचा फराळ बनायचा. हळूहळू धकाधकीच्या आयुष्यात घरच्या फराळाची जागा बाहेरच्या पाकिटबंद फराळाने घेतली. आज तर दिवाळीच्या फराळाला देशातच नाही तर परदेशातूनही मोठी मागणी असते. म्हणूनच दिवाळीचा फराळ विकून कोट्यधीश झालेली अनेक कुटुंबही आपल्याला दिसतात. असेच एक कुटुंब म्हणजे गोडबोले कुटुंब. होय, गोडबोलेंच्या फराळाला थेट परदेशातून मागणी असते. बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित डॉ. नेनेंशी लग्न होऊन अमेरिकेत स्थायिक झाली तेव्हा, तिच्या घरी याच गोडबोलेंचा फराळ पोहोचायचा. हळूहळू गोडबोलेंच्या या फराळाची परदेशांत राहणा-या भारतीयांत अशी काही ख्याती पसरली की, या फराळाची मागणी वाढली. आता तर गोडबोलेंच्या दिवाळीच्या फराळाची उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीचा पती हा सगळा कोट्यवधींचा व्याप सांभाळतो. होय, या अभिनेत्रीचे नाव आहे, किशोरी गोडबोले.
त्यांचे पती सचिन गोडबोले यांचे दादर येथे खास मराठी घरगुती खाद्य पदार्थाचे अर्थात फराळाचे अद्ययावत दुकान आहे. सचिन यांच्या आई सुमती गोडबोले यांनी अगदी पाच पदार्थ विकून हा व्यवसाय उभा केला होता. त्यांचा मुलगा सचिन हा जपानमधील एका बड्या कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. पण वडिलांच्या निधनानंतर आईने त्याला नोकरी सोडून तिचा व्यवसाय सांभाळण्याची गळ घातली आणि मुलाने आईच्या या शब्दाखातर उच्च पदाची नोकरी सोडली.
सचिन गोडबोले यांचा मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांची कन्या किशोरी हिच्यासोबत विवाह झाला. किशोरीने मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडल क्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि, एक दो तीन, खिडकी यासारख्या हिंदी व मराठी मालिकांत काम केले.
सध्या ती ‘मेरे साई’ या मालिकेत एका प्रमुख भूमिकेत काम करतेय. फुल ३ धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन या चित्रपटातही ती झळकली. सचिन आणि कोशोरी गोडबोले यांना सई आणि गौरी या दोन मुली आहेत. किशोरी गोडबोले सध्या मराठी सृष्टीत कमी दिसत असली तरी हिंदी मालिकेत तिने आपला चांगलाच जम बसवला आहे.