‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Mazhya Navryachi Bayko) ही मालिका किती गाजली, हे सांगायला नकोच. या मालिकेतून घराघरांत पोहोचलेले नाव म्हणजे अनिता दाते (Anita Date-Kelkar). मालिकेत तिने राधिकाची भूमिका साकारली होती. तिचा नागपुरी ठसका पाहून लोक राधिका या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडले होते. नव-याचे अर्थात गुरूनाथचे एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर माहित झाल्यानंतर परिस्थितीचा खंबीरपणे सामना करणा-या राधिकाची भूमिका अनिताने वठवली होती.अनिता ही मुळची नाशिकची असून तिचं बालपण, शिक्षण नाशिकमध्ये झालं आहे. त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी पुण्यात गेली. पुण्याच्या ललित कला केंद्रातून तिने पदवी घेतली. अनिताला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने ती शाळेत आणि कॉलेजमध्ये नाटकांमध्ये काम करत असे. याच अनिताचा खºया आयुष्यातील ‘गुरूनाथ’ कोण हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तर अनिताच्या पतीचं नाव आहे चिन्मय केळकर. चिन्मय हा सुद्धा अभिनयक्षेत्राशी संबंधित आहे. सुप्रसिद्ध लेखक अशी ओळख असलेला चिन्मय दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत काम करतो. अनिता व चिन्मयच्या लव्हस्टोरीची सुरूवात झाली होती ती कॉलेजमध्ये असताना.
होय, कॉलेजमध्ये शिकत असताना दोघांची भेट झाली. एकत्र नाटकात काम करताना मैत्री झाली आणि मग दोघंही कधी एकमेकांच्या प्रेमात पडले ते दोघांनाही कळलं नाही. ‘सिगारेट्स’ या नाटकाच्या तालमीवेळी तर हे प्रेम आणखीचं बहरलं. पण त्यावेळी दोघांनाही लग्न करायचं नव्हतं. अशात दोघांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.दीड वर्ष लिव्ह इनमध्ये राहिल्यानंतर अखेर दोघांनी लग्न केलं. आता दोघंही सुखात संसार करत आहेत.
अनिताने तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ या मालिकेत स्पृहा जोशीच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती दिसली होती. राणी मुखर्जीच्या ‘अय्या’ या चित्रपटात देखील तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती. अनिता खरी ओळख दिली ती ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेने असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.