छोट्या पडद्यावरील 'कौन बनेगा करोडपती' हा शो आणि महानायक अमिताभ बच्चन हे जणू समीकरण बनलं आहे. होस्ट म्हणून बिग बी अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या शोला नवी ओळख मिळवून दिली. प्रश्नोत्तरे अशा स्वरुपात असलेल्या या शोमध्ये बिग बी अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकांशी त्यांच्या खास शैलीत संवाद साधत कौन बनेगा करोडपती शोला नवं परिमाण मिळवून दिलं. बिग बींचा खास अंदाज आणि शोचं स्वरुप यामुळे हा शो रसिकांचा लाडका शो बनला आहे. या शोनं अनेकांची स्वप्नं पूर्ण केली आहेत.
भारतीय टीव्हीच्या इतिहासामधील सगळ्यात यशस्वी कार्यक्रम म्हणून कौन बनेगा करोडपती नावारुपाला आला आहे. कोट्यवधी कमावण्यासह बिग बींसह स्क्रीन शेअर करण्याचं स्वप्न अनेक रसिकांनी पाहिली आहेत. यापैकी अनेक भाग्यवंतांचं नशीब केबीसीमुळे पालटलं आहे. अशाच भाग्यवंतांपैकी एक म्हणजे केबीसीच्या पहिल्या सीझनचा विजेता मराठमोळा हर्षवर्धन नवाथे. १९ वर्षांपूर्वी हर्षवर्धन यांनी केबीसीचे विजेतेपद पटकावत नवा इतिहास रचला होता. विजेतेपद पटकावल्यानंतर मुंबईकर असणाऱ्या हर्षवर्धन यांची आजही मुंबईशी नाळ घट्ट जोडलेली आहे. या शोनं हर्षवर्धन यांना नवी ओळख मिळवून दिली. आज अनेकजण त्यांना प्रत्येकजण ओळखत नसला तरी केबीसी पहिला विजेता म्हणून त्यांचं नाव साऱ्यांनाच माहित आहे.
हर्षवर्धन नवाथे सध्या महिंद्रा अँड महिंद्राच्या CSR & एथिक्स डिपार्टमेंटमध्ये काम करतात. २००५ पासून या कंपनीत काम करत आहेत. हर्षवर्धन जेव्हा केबीसी जिंकले त्यावेळी ते विद्यार्थी होते. त्यावेळी ते युपीएससीची तयारी करत होते. आयएएस होऊन देशाची सेवा करण्याचं त्याचं स्वप्न होतं. मात्र केबीसी जिंकल्यानंतर त्याचं आयुष्य खूप पालटलं. युपीएससीच्या परीक्षेवरील त्यांचं लक्ष काहीसं कमी झालं. मात्र त्यांनी त्यांचं स्वप्न बदललं नाही.
सध्या कार्पोरेट सेवेत असलेले हर्षवर्धन सामाजिक संस्थांसोबतही काम करतात. युपीएससीसी त्यांच्या डोक्यात एमबीए करण्याचा विचारही होता. मात्र त्याचा खर्च त्यांना पेलवणारा नव्हता. मात्र केबीसी जिंकल्यानंतर त्यांनी इंग्लंडला जाऊन एमबीए केलं. त्यानंतर काही ठिकाणी काम करून ते मुंबईत परतले. गेल्या १५ वर्षांपासून ते मुंबईतच राहतायत आणि काम करतायत.