ठळक मुद्देकॉफी विथ करण 6’मध्ये महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्या व लोकेश राहुलवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) निलंबनाची कारवाई केली आहे आणि त्यांना आॅस्ट्रेलिया दौ-यातून माघारी बोलावले आहे.
‘कॉफी विथ करण 6’ या करण जोहरच्या प्रसिद्ध चॅट शो एक एपिसोड ‘हॉटस्टार’वरून काढून टाकण्यात आला आहे. आता हा एपिसोड कुठला हे, नव्याने सांगायची गरज नाही. ‘कॉफी विथ करण 6’ चा तोच एपिसोड, ज्यात क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के एल राहुलने हजेरी लावली होती. हार्दिक आणि लोकेश राहुल या दोघांनी या एपिसोडमध्ये महिलांविषयी काही आक्षेपार्ह विधाने केली होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे दोघांवर प्रचंड टीका झाली. हा वाद इतका विकोपाला पोहोचला की, अखेर ‘कॉफी विथ करण 6’ चा संबंधित एपिसोड ऑनलाइन स्ट्रिमिंग पार्टनर ‘हॉटस्टार’वरून काढून टाकण्यात आला आहे. इतके कमी की काय, तर स्टार वर्ल्ड या वाहिनीनेही त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या एपिसोडचे सर्व टीझर आणि फोटो काढून टाकलेत.
‘कॉफी विथ करण 6’मध्ये महिलांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या हार्दिक पांड्या व लोकेश राहुलवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) निलंबनाची कारवाई केली आहे आणि त्यांना आॅस्ट्रेलिया दौ-यातून माघारी बोलावले आहे. पण, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सहा सदस्यीत समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालानंतर पुढील शिक्षा सुनावण्यात येईल. हार्दिक पांड्या व लोकेश राहुल यांचे मुंबई पोलिसांनीही कान टोचले आहेत. मुंबई पोलिसांनी ''A ‘Gentleman’ is a Gentleman, always and everywhere'' असे ट्विट करून पांड्या व राहुलचे कान टोचले.
सोशल मीडियावर टिकेचा होणारा भडीमार पाहता हार्दिकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन जाहीर माफी मागितली होती. सर्वांची माफी मागत, महिला वर्गाचा अनादर करण्याचा आपला कोणताही हेतू नसल्याचे त्याने या पोस्टमध्ये म्हटले होते.