कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या नव्या सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात होते. या कार्यक्रमाचा नव्या सिझनचा पहिला भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या भागात प्रेक्षकांना दीपिका पादुकोण आणि आलिया भट यांना पाहायला मिळाले. आता या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात प्रेक्षकांना अक्षय कुमार आणि रणवीर सिंग यांच्या आयुष्यातील गुपिते जाणून घेता येणार आहेत.
कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रेक्षकांना खूप आवडला असल्याचे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत. एवढेच नव्हे तर कॉफी विथ करण हा हॅशटॅग सुद्धा सोशल मीडियावर ट्रेंड झालेला आहे. कॉफी विथ करण 6 च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादानंतर आता या कार्यक्रमात कोण कोण सेलिब्रेटी हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.
कॉफी विथ करण या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक करण जोहरने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर फोटो पोस्ट करून त्याच्या कार्यक्रमातील काही सेलिब्रेटींबाबत माहिती दिली आहे. तसेच काही सेलिब्रेटींनी त्यांच्या अकाऊंटवर या कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले आहेत.
आलिया भट-दीपिका पादुकोण, अक्षय कुमार-रणवीर सिंग यांच्यानंतर आता जान्हवी कपूर आणि अर्जुन कपूर, सारा अली खान-सैफ अली खान, आमिर खान, वरूण धवन- कॅटरिना कैफ यांसारखे सेलिब्रेटी कॉफी विथ करण या कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत.
करण जोहरने अर्जुन आणि जान्हवीचा फोटो पोस्ट करून हा भाग दोन भावंडाचा असणार असल्याचे म्हटले आहे.
सैफ अली खान आणि सारा अली खान यांचा फोटो पोस्ट करत या वडील-मुलीसोबत गप्पा मारायला खूप मजा आली असे करणने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे.
करणने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोत आमिर खानच्या हातात आपल्याला कॉफी मग पाहायला मिळत आहे. त्याचसोबत आमिर कॉफी हाऊसमध्ये आला असल्याचे करणने लिहिले आहे.
कॉफी विथ करण या कार्यक्रमात कॅटरिना कैफ आणि वरूण धवन यांच्यासोबत संवाद साधायला खूपच मजा आली असे इन्स्टाग्राम पोस्टमध्ये करणने लिहिले आहे.