Join us  

"आधी आपल्या घरातील मुलांना संस्कारित...", ऐश्वर्या नारकर यांनी थेट मुद्द्यावर भाष्य केलं

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 10:18 AM

देशभरातुन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर क्रूरपणे बलात्कार (Kolkata Doctor Rape and Murder Case) करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेमुळे देशातील समाजमन ढवळून निघालं आहे. एकीकडे सामान्य लोक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत, दुसरीकडे डॉक्टरही संपावर गेले आहेत. देशभरातुन आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. याबाबत सेलिब्रिटीही सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर  ( Aishwarya Narkar ) यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. 

ऐश्वर्या यांनी कोलकाता प्रकरणातील तरुणीला श्रद्धांजली वाहत आपलं मत व्यक्त केलं आहे.  त्या म्हणाल्या, "गेले काही दिवस आपण कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या बलात्कार, हत्येविषयी ऐकतोय आणि अंतर्मुख होतोय. या सगळ्या विषयावर बोलण्याचं माझ्यात पण धारीष्ट नव्हतं. त्यामुळे थोडे दिवस मी थांबत होते. कारण जे घडलंय ते मानवी संवेदनाच्या बाहेरचं आहे. हे अमानवी आहे. याच्यावर रिअ‍ॅक्ट होणं किंवा काहीतरी करणं. याच्यावर काही पर्यायचं दिसत नाहीये".

ऐश्वर्या म्हणाल्या, "मला असं वाटतं, आतापर्यंत आपण मुलींना सशक्त करत होतो, सबळ करत होतो, काय वागायचं, काय वागू नये, काय चुकीच आहे, काय बरोबर आहे, हे आपणं मुलींनाच शिकवण्याचा प्रयत्न करत होतो. पण मला असं वाटतं आपल्या घरातील मुलांना संस्कारित केलं आणि मुलांना याची जाणीव करून दिली की, काय चुकीच आहे, तुम्ही एखाद्या स्त्रीबरोबर, एखाद्या मुलीबरोबर किंवा एका माणसाने दुसऱ्या माणसाबरोबर कसं वागायला हवं, याचे संस्कार जर आपण आपल्या घरातून दिले तरच हे कुठेतरी थांबू शकत".

पुढे त्या म्हणाल्या, "ही एकच केस नाहीये. आपल्या आजूबाजूला अनेक केस घडत आहेत. त्या आपल्याला कळतंही नाहीत. तर मला असं वाटतं की, हे अमानवी कृत्य थांबवण्यासाठी आपण आपल्या पुढच्या पिढीला संस्कारीत करणं खूप गरजेचं आहे. ते केलं तरच कुठेतरी हे थांबू शकत. त्यामुळे मला असं वाटतं, आपण सगळ्यांनी यादृष्टीने विचार करायला हवा. मनापासून श्रद्धांजली".  

टॅग्स :ऐश्वर्या नारकरसेलिब्रिटीपश्चिम बंगाल